सेवासदन शिक्षण संस्था ही नागपुरातील नावाजलेली जुनी शिक्षण संस्था आहे. ह्यावर्षी संस्था 97 व्या वर्षांत पदार्पण करीत आहे. सेवासदन शिक्षण संस्था अनेक प्रेरणादायी व स्तुत्य उपक्रम आयोजित करीत असते. यातील एक उपक्रम म्हणजे रमाबाई रानडे शिक्षण प्रबोधन पुरस्कार सोहळा, हा सोहळा संस्थेच्या वर्धापन दिनी 2 जानेवारी रोजी दरवर्षी आयोजित करण्यात येतो.
स्व. रमाबाईंच्या कार्याचा वसा अव्याहत सुरु राहावा, त्यांच्या कार्याचा परिचय नविन पिढीला व्हावा यासाठी त्यांच्याच नावाने शिक्षणाच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय व भरीव कार्य निःस्वार्थपणे करणारऱ्या व्यक्ती किंवा संस्थेला सेवासदन शिक्षण संस्थेच्या वतीने सन 2016 पासून विदर्भस्तरीय रमाबाई रानडे स्मृती शिक्षण प्रबोधन पुरस्कार देवून गौरान्वित करण्यात येते.
आत्तापर्यंत, संज्ञा संवर्धन संस्था नागपूर, श्रीमती जिज्ञासा चवलढाल कुबडे, दिनदयाल बहुउद्देशीय प्रसारक मंडळ यवतमाळ, अभ्युदय ग्लोबल व्हीलेज स्कूल नागपूर, श्री मंगल बहुउद्देशीय शिक्षण, तांत्रिक शिक्षण व प्रशिक्षण संस्था सावनेर, सेवासर्वदा संस्था नागपूर, उमेद एज्युेशन चॅरिटेबल ट्रस्ट रोठा, वर्धा, व मागच्या वर्षी एन्करेज एज्युकेशनल फाउंडेशन अकोला इत्यादी संस्था रमाबाई रानडे स्मृती शिक्षण प्रबोधन पुरस्काराच्या मानकरी ठरल्या आहेत.

ह्यावर्षी या पुरस्काराचे 9 वे वर्ष असून ह्या पुरस्कारासाठी वृत्तपत्रे, अन्य माध्यमाद्वारे समाजातील कर्तृत्ववान व्यक्ती/संस्थाची माहिती, समाजातील प्रतिष्ठित मान्यवरांनी शिफारस करण्याचे आवाहन संस्थेद्वारे करण्यात आले होते. तसेच पुरस्कार निवड समितीद्वारा मुल्यांकन करून एकमताने विदर्भस्तरीय रमाबाई रानडे स्मृती शिक्षण प्रबोधन पुरस्कार 2024 साठी भटके विमुक्त कल्याणकारी परिषद संचालित ‘‘पालावरची शाळा’’
जि. भंडारा ह्या संस्थेची निवड करण्यात आली आहे.
पोटाला कोरभर तुकडा मिळविण्यासाठी धडपडणारे, दगड फोडणारे, नाचणार गाणारे, कसरत करणारे, अर्धनग्न अवस्थेत असणारा एक विशिष्ठ समूह आणि त्यांच्या पायाला घेटणारी खांद्यावरच्या झोळीत लटकणारी कुपोषित बालकं… नेहमीच उपेक्षित अशा या समाजाला मुख्य प्रवाहात आणून त्यांना सन्मानाचं जगणं मिळवून देण्यासाठी, तसेच महिला सशक्तीकरण, स्वावलंबन सन्मान आणि त्यांच्या समस्या सोडविणे इत्यादी कार्यासोबतच ‘‘पालावरची शाळा’’ च्या माध्यमातून शिक्षणाचे धडे विद्यार्थ्यांना देण्यात येत आहेत. अशा 1991 पासून विशेष कार्य करणाऱ्या भटके विमुक्त कल्याणकारी परिषद जि.भंडारा ह्या संस्थेला, सेवासदन संस्थेच्या वर्धापनदिनी म्हणजेच 2 जानेवारी 2024 रोजी हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. पुरस्काराचे स्वरूप 51000/- रु. रोख, स्मृतीचिन्ह, मानपत्र असे राहणार आहे.
या विदर्भस्तरीय रमाबाई रानडे स्मृती शिक्षण प्रबोधन पुरस्कार-2024 वितरण सोहळ्याचे प्रमुख अतिथी योजक-शाश्वत विकासासाठी संशोधन आणि धोरणात्मक नियोजन केंद्र पुणे या संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. डाॅ. गजानन डांगे, तर समारंभाच्या अध्यक्षस्थानी नागपूर मधील सुप्रसिद्ध उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते, मुरारका ग्रुपचे संचालक मा. श्री. शंकर मुरारका प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. सेवासदन शिक्षण संस्थेच्या परिसरामध्ये 2 जानेवारी 2024 ला सायंकाळी 5.30 वाजता हा सोहळा संपन्न होणार आहे.
विदर्भ तसेच नागपूर नगरीतील शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी, युवावर्ग, विद्यार्थी यांनी मोठया संख्येने या समारंभाला उपस्थित राहावे असे सेवासदन संस्थेच्या अध्यक्ष श्रीमती कांचन गडकरी, सचिव श्रीमती वासंती भागवत यांनी व रमाबाई रानडे स्मृती शिक्षण प्रबोधन पुरस्कार समितीच्या वतीने आवाहन केले आहे.
(श्रीमती वासंती भागवत)
सचिव, सेवासदन शिक्षण संस्था, नागपूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here