आज वाहतूकीच्या बळावर देशातील संपूर्ण उलाढाल होत असते.वाहतूक सुरळीत आहे म्हणून प्रत्येक वस्तू तळागाळापर्यंत पोहचतात. अशा परिस्थितीत जर संप झाला तर याचे परिणाम देशाच्या १४० कोटी जनतेला भोगावे लागतात. सरकारच्या मोटार वाहन कायद्याच्या विरोधात वाहतूकदारांना अचानक रस्त्यावर का उतरावे लागले ? किंवा संपाचा मार्ग का अवलंबावा लागला ? याचा विचार सरकारने गांभीर्याने केला का ? सरकारने कायदा बनवितांना मोटार वाहतूक संघटनांशी अगोदर चर्चा केली का ? देशातील संपूर्ण राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली का? यावरून स्पष्ट होते की सरकारने कोणत्याही संघटनांशी किंवा देशातील राज्यांच्या वाहतूक संबंधित विभागांशी किंवा संघटनांशी चर्चा न करता नवीन मोटार वाहन कायदा बनविल्याचे दिसून येते. दुर्घटनांवर आळा बसावा व गुन्हेगारांना योग्य शिक्षा व्हावी हे योग्य व मान्य आहे व याचे स्वागत सर्वच स्तरातून व्हायला पाहिजे आणि होईल सुध्दा. परंतु वाहन चालकांच्या हातुन चुकीने जर दुर्घटना घडली तर त्यांच्या तुटपुंज्या पगारातुन त्याने ७ लाख रुपये दंडाची रक्कम कोठुन भरावी.हिट अँड रन कायद्यात दोन वर्षांची सजा होती तीला एकदम १० वर्षे करने कितपत योग्य आहे. यामुळे दुर्घटनांवर आळा बसेल काय? याचाही विचार सरकारने करायला हवा. फक्त कायदा बनवुन चालणार नाही तर, सरकारने सुध्दा दुर्घटनांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे व त्या-त्या पध्दतीचे नियोजन असायला हवेत. संसदेत मंजूर झालेल्या भारतीय न्यायिक संहिता २०२३ या कायद्यानुसार हिट अँड रन प्रकरणात संबंधित दोषी चालकाला ७ लाख रुपयांपर्यंत दंड आणि १० वर्षांपर्यंतच्या तुरूंगवासाची तरतूद आहे. नवीन वाहन कायद्यातील १० वर्षाची शिक्षा ठिक आहे. परंतु ७ लाख रुपये दंड कोठुन भरणार.त्या वाहन चालकाचा पगार किती असतो याचा विचार सरकारने केला का ? त्यांच्या परिवाराचा खर्च यांचा एकुण विचार केला का ? आज वाहन चालकांचा तुटपुंजा पगार त्यात त्यांच्या परिवाराचा खर्च आणि अचानक त्याच्या हातुन चुकीने दुर्घटना झाली तर तो शिक्षा तर भोगुन घेईल. परंतु त्यांच्या जवळ ७ लाख रुपये येणार कोठुन याचा सरकारने कायदा बनवितांना थोडातरी विचार केला का ? आणि दहा वर्षे शिक्षेच्या काळात त्याच्या परिवारावर काय परिणाम होईल याचाही विचार व्हायला हवा. अशा परिस्थितीत जर त्यांच्या घरच्यांना अट्याक आला किंवा मोठा आजार झाला  तर!असे अनेक प्रश्न उद्भवतात. यामुळेच देशासह महाराष्ट्राच्या विविध भागांमध्येही ट्रकचालक, वाहतूकदारांनी आक्रमक भूमिका घेऊन संप पुकारला होता. परंतु आता सरकारच्या लक्षात येत आहे की नवीन मोटार वाहन कायद्यात दुरुस्ती करण्याची गरज आहे. भारतीय दंडविधानाच्या कलम २७९(निष्काळजीने वाहन चालवणे), ३०४-अ (निष्काळजीने मृत्यू होणे) आणि ३३८ (दुसऱ्याचा जीव धोक्यात घालणे) अंतर्गत हिट अँड रन प्रकरणातील दोषी ट्रक-बसचालकाला सध्या दोन वर्षांच्या कारावासाची तरतूद आहे. परंतु नवीन मोटार वाहन कायदा दुरुस्ती नंतर कलम १०४ (२) अंतर्गत एखादा चालक अपघातानंतर घटनास्थळावरून पळून गेला किंवा त्याने पोलिस किंवा दंडाधिकाऱ्यांना अपघाताची माहिती दिली नाही, तर त्याला सध्याच्या पाचपट म्हणजे १० वर्ष तुरूंगवास व जबर दंड म्हणजे ७ लाख रुपये हा सरकारचा घाईघाईने घेतलेला निर्णय असल्याचे मी समजतो. त्यामुळे या नवीन कायद्यातील त्रुटींचा तज्ञांच्या मदतीने विचार करून पुढील पावले सरकारने उचलावीत. आपण साधारणतः विचार केला तर वाहतूकदारांमध्ये ८० टक्के लोक गरीब टपक्यातील असतात आणि बाकी सर्वसाधारण किंवा श्रीमंत असतात एखाद्या श्रीमंत व्यक्तींच्या हाताने दुर्घटना झाली तर तो ७ लाखांपर्यंत दंड सहज भरू शकतो. परंतु गरीब व सर्वसामान्य व्यक्ती एवढी रक्कम आणणार कोठून हाही विचार सरकारने करायला पाहिजे. कोणतीही दुर्घटना असो ती दुःखद आहे.यात कोणाचा तरी आप्त असतोच त्याचे दुःख भयावह असते यात दुमत नाही. मुख्यत्वेकरून कोणत्याही दुर्घटना असो ह्या सांगुन येत नाही अचानक होतात आणि ह्या संपूर्ण मानवाच्या चुकांमुळे होतात व त्याचे प्रायश्चित्त संपूर्ण परिवाराला दुःखाच्या स्वरूपात भोगावे लागतात ही सत्य परिस्थिती आहे. हिट अँड रन कायद्याअंतर्गत सर्वसामान्यांचा बळी जाणार नाही याचीही दक्षता सरकारने घेतली पाहिजे व गुन्हेगारांना सजाही मिळाली पाहिजे यापध्दतीने नवीन मोटार वाहन कायद्यात दुरुस्ती करण्याचा प्रयत्न सरकारने करावा. दारू पिऊन वाहन चालवितांना दुर्घटना, मुद्दाम कोणाचा बळी घेण्याच्या उद्देशाने दुर्घटना अशांसाठी १० वर्षांची शिक्षा व ७ लाख रुपये दंड योग्य आहे. परंतु चुकीने होणाऱ्या दुर्घटनांच्या बाबतीत सरकारने सविस्तर चर्चा करून पुढील पाऊले उचलावीत असे माझे मत आहे. त्याच बरोबर वाहन चालक व मालक यांना नम्र विनंती आहे की वाहन चालवितांना आपल्या प्रमाणे दुसऱ्याच्या जिवाचा सुद्धा विचार करावा यातच खरे आयुष्य व खरी मानुसकी आहे. आपण सर्वच चालक-मालक होणाऱ्या दुर्घटनांवर आळा घालण्यासाठी सरकारशी व जनतेशी संवाद प्रस्थापित करण्यासाठी कटिबद्ध असावे हिच अपेक्षा ! दुर्घटनांच्या बाबतीत मी हेच सांगेल की जान है तो जहान है हा मुलमंत्र सर्वांनीच अंगिकारून वाहन चालवावे व दुर्घटनांवर आवर घालावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here