दैनिक दिव्य वतन
नागपूर – कुणबी समाजाच्या नेत्यांना महायुती सरकार विविध गुंन्हयांमध्ये अडकवून त्यांची राजकीय हत्या करीत असल्याने सर्व शाखीय अखिल भारतीय कृती समितीच्यावतीने आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला.
पुरुषोत्तम शहाणे यांच्या नेतृत्वात कृती समितीची बैठक गुरूवारी जुनी शुक्रवारी येथील विठ्ठल रुख्मिनी मंदिरात येथे घेण्यात आली. यामध्ये सर्वपक्षीय समाजाच्या प्रतिनिधी सहभागी झाले होते. काटोल-नरखेड विधानसभा क्षेत्राचे आमदार व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना खोटे आरोप करुन अडकवण्यात आले होते. देशमुख यांच्यावरचे आरोप सरकारला सिध्द करता आले नाहीत. तक्रारदारानेच आपली तक्रार मागे घेतली. आता सावनेरचे आमदार व माजी मंत्री सुनील केदार यांना तुरुंगात टाकण्यात आले आहे. केदारांचा विषय न्यायप्रविष्ट आहे. केदारांनी कुठलाही घोटाळा केला नाही. बँकेचे आर्थिक व्यवहार करताना अध्यक्ष या नात्याने त्यांचा निर्णय चुकला. असे असतानाही जामीन दिला जात नाही. न्यायालयात बाजू मांडण्यासाठी जाणीवपूर्वक सरकारच्यावतीने विलंब केला जात आहे. एकूणच महायुती सरकार बहुजनांचे नेतृत्व संपवण्याचा प्रयत्न करीत असल्याने सर्वांनी एकत्रित लढा देण्याचा निर्णय घेण्यात आला.
जरांगे पाटिल यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कुणबी समाजाचे प्रमाणपत्र देण्यात यावे याकरिता दबाव वाढवल्यानंतर सर्व शाखीय अखिल कुणबी कृती समितीच्यावतीने संविधान चौकात उपोषण केले होते. त्याची दखल राज्य शासनाला घ्यावी लागली होती. आता समितीच्यावतीने कापूस, धानाला भाव, बोनस, कोरडवाहू शेतकºयांच्या अनुदानासाठी आंदोलन उभे करण्याचा निर्णय गुरुवारच्या बैठकीत घेण्यात आला. कृती समितीच्यावतीने जगतगुरु तुकाराम महाराज यांची भव्य जयंती नागपूरमध्ये साजरी केली जाणार आहे. याकरिता लागणारा खर्च वर्गणीच्या माध्यमातून गोळा केला जाणार आहे. कृती समितीच्या बैठकीला पुरुषोत्तम शहाणे यांच्यासह राष्ट्रीय जनसुराज्य पक्षाचे अध्यक्ष राजेश काकडे, ओबीसी नेते दुनेश्वर आरीकर, सुरेश वर्षे, पांडुरंग वाकडे, बाळा शिंगणे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here