नागपूर – केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री श्री. नितीन गडकरी यांनी आज (रविवारी) जनसंपर्क कार्यक्रमात नागरिकांकडून विविध मागण्यांची निवेदने स्वीकारली. त्याचवेळी कृषी, माहिती तंत्रज्ञान आदी क्षेत्रांमधील नाविन्यपूर्ण कल्पनाही त्यांनी समजून घेतल्या.

खामला येथील जनसंपर्क कार्यालयात नागरिकांनी निवेदनांसह सकाळपासूनच मोठी गर्दी केली. मोठ्या संख्येने महिला व पुरुष कार्यालयात उपस्थित होते. यामध्ये दिव्यांगांचाही समावेश होता. काही दिव्यांगांनी नोकरीसाठी तर काहींनी कृत्रीम पायाच्या मागणीसाठी निवेदन दिले. नवीन रस्त्यांसाठी, अनुकंपा तत्वावरील नोकऱ्यांसाठी, आरोग्य क्षेत्रातील मागण्यांसाठी नागरिकांनी निवेदने दिली. यावेळी ना. श्री. गडकरी यांनी नागरिकांशी संवाद साधून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. व्यक्तिगत पातळीवरील प्रश्नांसह संस्था-संघटना, शहराच्या व खेड्यापाड्यांमधील विषयांवर नागरिकांनी ना. गडकरी यांच्यासोबत चर्चा केली. दिव्यांग बांधव-भगिनी तसेच ज्येष्ठ नागरिक सरकारी योजनांचा लाभ मिळण्यात येत असलेल्या अडचणीचा विषय घेऊन आले. विविध मागण्यांची निवेदने स्वीकारून मंत्री महोदयांनी संबंधित विभागांकडे या संदर्भात पाठपुरावा करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. यासोबतच रेल्वे, महामार्ग, कृषी, सहकार, पर्यावरण, पाणीपुरवठा, ऑटोमोबाईल अशा विविध क्षेत्र व विभागांशी संबंधित विषय ना. गडकरी यांनी ऐकून घेतले. जागेच्या प्रश्नासंदर्भातील निवेदनेही त्यांनी स्वीकारली. सामाजिक, साहित्यिक, धार्मिक तसेच अध्यात्माशी संबंधित संस्थांनीही श्री. गडकरी यांची भेट घेतली. यावेळी काही पुस्तकांचे तसेच दिनदर्शिकेचे प्रकाशनही  श्री. गडकरी यांच्या हस्ते झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here