केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी : नॅशनल कन्व्हेन्शन अॉन क्वालिटी कन्सेप्ट्सचा समारोप

नागपूर – क्वालिटी या शब्दात खूप मोठा अर्थ दडला आहे. पण गुणवत्तेसोबत प्रामाणिकपणा, पादरर्शकता आणि विश्वासार्हता देखील तेवढीच महत्त्वाची आहे आणि हेच एकविसाव्या शतकाचे भांडवल आहे. यातून शॉर्टकट शक्य नाही, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री श्री. नितीन गडकरी यांनी शनिवार रोजी 6 जानेवारीला केले.

क्वालिटी सर्कल फोरम अॉफ इंडियाच्या वतीने आयोजित नॅशनल कन्व्हेन्शन अॉन क्वालिटी कन्सेप्ट्सच्या समारोपीय सोहळ्यात  श्री. नितीन गडकरी बोलत होते. यावेळी क्वालिटी सर्कल फोरमचे चेअरमन अविनाश मिश्रा, श्री. राजेंद्र पुरोहित, श्री. मनीष नुवाल यांची प्रमुख उपस्थिती होती. नागपुरात आयोजित या परिषदेत दहा हजार प्रतिनिधी सहभागी झाल्याबद्दल आनंद व्यक्त करीत या परिषदेतून नक्कीच एक नवी दिशा मिळेल, असा विश्वास श्री. गडकरी यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, ‘क्वालिटी सर्कल फोरमसोबत काम करण्याची मला १९९५ मध्ये संधी मिळाली. त्यावेळी राज्याचा सार्वजनिक बांधकाम मंत्री होतो. श्रीमती पुनावाला आणि त्यांच्या टीमसोबत कामाचा उत्तम अनुभव मला मिळाला. मुंबईत ५५ उड्डाणपूल, वरळी-बांद्रा सी-लिंक, मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वे अशी अनेक कामे केली. त्यावेळी १८०० कोटींच्या सरकारी प्रकल्पांची कामे करण्यासाठी २६ हजार लोक होते. त्यानंतर आम्ही एमएसआरडीसीची स्थापना करून ८ हजार कोटींची कामे केवळ ४९ लोकांमध्ये केली. हेच व्यवस्थापनाचे कौशल्य आहे.’ उत्तम व्यवस्थापनासोबत उत्तम गुणवत्ता राखणे महत्त्वाचे असते आणि त्यासाठी वेगवान निर्णयप्रक्रिया, पारदर्शकता आणि भ्रष्टाचारमुक्त व्यवस्था देखील आवश्यक असते, असेही श्री. गडकरी म्हणाले. ‘क्वालिटी सर्कलच्या माध्यमातून आपण सारे तांत्रिक शिक्षण घेतच आहात; पण त्यासोबत संवेदनशीलता आणि मानवी मूल्ये देखील आत्मसात करावी लागतील. मानवी संबंध चांगले असणे आवश्यक आहे,’ असेही श्री. गडकरी म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here