उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गरजूंना चष्मे वाटप

नागपूर – केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून स्व. भानुताई गडकरी ग्रामीण विकास संस्थेद्वारा सुरू असलेल्या अभियानांतर्गत अवघ्या काही महिन्यांमध्ये ७५ हजाराहून अधिक नागपूरकरांची निःशुल्क नेत्रतपासणी करण्यात आली. काल (मंगळवार, दि. ९ जानेवारी) नंदनवन येथे आयोजित शिबिरात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गरजूंना चष्म्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी ७५ हजार नेत्र तपासण्या पूर्ण केल्याबद्दल उपमुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले. संस्थेने नेत्र, दंत, कर्ण तपासणी अभियानांतर्गत १ लाखांचा टप्पा गाठण्याच्या दिशेने वाटचाल केली आहे.

स्व. भानुताई गडकरी ग्रामीण विकास संस्थेद्वारा नागपूरकरांसाठी २७ मेपासून नेत्र तपासणी अभियान सुरू करण्यात आले. आतापर्यंत संपूर्ण नागपूर शहरात ५०३ नेत्र तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले. याच मालिकेत काल (मंगळवार) संत जगनाडे महाराज पुण्यतिथी निमित्त नंदनवन येथील संत जगनाडे महाराज चौक येथे आयोजित आरोग्य शिबिरात ७५ हजार नेत्र तपासण्या पूर्ण झाल्या. या शिबिराला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस आणि आमदार कृष्णा खोपडे यांनी भेट दिली. यावेळी मा. उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते गरजू लाभार्थ्यांना चष्मे वाटप करण्यात आले. नागपुरातील नागरिकांसाठी २७ मे रोजी नेत्र सेवा संकल्प सुरू करण्यात आल्यानंतर ५०३ शिबिरांमध्ये एकूण ७५ हजार ६३३ लोकांची निःशुल्क नेत्रतपासणी करण्यात आली असून यातील सात हजारांहून अधिक लोकांना अत्यल्प दरात चष्मे वाटप करण्यात आले. यासोबतच २ हजार ३०० हून अधिक रुग्ण मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरले आहेत. उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिबीर संयोजक डॉ. श्रीरंग वराडपांडे, डॉ. गिरीश चरडे, विलास सपकाळ, डॉ. अजय सारंगपुरे, डॉ. संजय लहाने, डॉ. अवंतिका वाडेकर, डॉ. समीक्षा आदी मंडळी कार्यरत आहेत.

कर्ण व कर्करोग तपासणीलाही प्रतिसाद

संस्थेद्वारे ३८६७ रुग्णांची कर्ण तपासणी करुन १५६ रुग्णांना केंद्रीय मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांच्या हस्ते माफक दरात डिजिटल कर्णयंत्र देण्यात आले. तसेच ३४५६ नागपूरकरांची निःशुल्क दंत तपासणी करण्यात आली आहे. यासोबतच ३० डिसेंबर २०२३ पासून नागपूरकरांसाठी निःशुल्क कर्करोग तपासणी देखील सुरू करण्यात आली आहे. संपूर्ण नागपुरात शिबिरे आयोजित करण्यात येत असून त्यालाही उत्तम प्रतिसाद लाभत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here