२१ जानेवारी रोजी थोर समाजवादी नेते व जनता पक्षाचे माजी रेल्वे मंत्री आदरनीय मधु दंडवते याचे समारोप व त्या निमित्त मुंबईत यशवंतराव चव्हाण सभागृहात कार्यक्रम. आदरनीय दंडवते ऊर्फ नाना यांची एक आठवण.
सामान्य जनतेचाही विचार करणारा नेता…प्रा. मधु दंडवते.
   १९८४ / ८५ वर्ष असावे. मा. मधु दंडवतेजी ऊर्फ नाना खासदार होते. केंद्रात काँग्रेसचे सरकार होते. महाराष्ट्रातून लोकसभेत नाना एकमेव  जनता पक्षातर्फे निवडून आले होते. महाराष्ट्र प्रदेश जनता पक्षाचे अध्यक्ष म्हणून त्या काळी नंदुरबार- शहादे येथील अण्णासाहेब पी. के. पाटील उर्फ अण्णा हे कार्यरत होते. स्व. राजाराम बापू  नंतर पक्षाचे उपाध्यक्ष P. K. अण्णांना अध्यक्ष बनविण्यात आले होते. आर्थिक खर्च त्या काळी अध्यक्ष या नात्याने एकटे अण्णा बघत !
मी त्याकाळी अण्णांच्या आमदार निवासात रूम मध्येच निवासासाठी होतो. अंधेरी येथील भवन्स कॉलेज मध्ये सकाळी शिकवायचे व दुपारी जनता पक्ष कार्यालयात येऊन अण्णांना मदद करायची हा माझा रोजचा उपक्रम ! त्यामुळे पक्षातील सारेच मला ओळखत. पक्षातील सर्वच वरिष्ठ मुंबईच्या जनता पक्ष कार्यालयात आठवड्यात २/३ दिवस येत असतं. मृणाल ताई, जॉर्ज फर्नांडिस, बापू काळदाते, बबनराव ढाकणे, विश्वासराव पाटील, जगन्नाथ जाधव, हसमुख उपाध्याय, निहाल अहमद,  पन्नालाल सुराणा, संभाजीराव काकडे, डॉ. कुमार सप्तर्षी, डॉ. रत्नाकर महाजन, शांती पटेल, रतन सिंह राजदां, जनता बँकेचे रणजित बाबू, हुसेन दलवाई आदी बडे बडे नेते कार्यालयात येत व राज्य पातळीवरील चर्चा करीत. माजी रेल्वे मंत्री प्रा. मधु दंडवते ऊर्फ नाना व सोबत प्रमिलाताई दंडवते ही महिन्यात १/२ वेळा प्रदेश कार्यालयात येत असत.. फारच नम्र पणे हास्य वदनाने करून ते प्रत्येकाशी बोलत असतं. जनता पक्षाच्या युवा आघाडीचा मी सरचिटणीस या नात्याने रोज कार्यालयात बसत असे व या महान नेत्यांचे संपर्कात राहण्याचा प्रयत्न करीत असे.  मी ही प्राध्यापक आहे हे आदरनिय नानांना समजल्यावर ते मला बऱ्याच वेळा प्रेमाने जवळ बोलावीत व कधी कधी मुंबईत कुठे जायचे असेल तर मला सोबत घेऊन जात हे माझे भाग्य !!
       महाराष्ट्रात जनता पक्षाचे प्रत्येक जिल्ह्यात चांगले संगठन होते.  मजबूत बांधणी होती. ४०/५० आमदारांची फळी जनता पक्षात होती म्हणून राज्यात जनता पक्षाचे गावोगावी सक्रिय कार्यकर्ते होते. जनता पक्षास P. K. अण्णांसारखा दमदार नेता मिळाला होता. आर्थिक चणचण नव्हती. कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह होता. क्रांतिकारी नेत्यांची फळीच जनता पक्षात त्या वेळी होती म्हणून सत्ताधारी पक्षात जनता पक्षाचा नेत्यांचा व कार्यकर्त्यांचा दबदबा होता. विधान सभा व परिषद ही मंडळी गाजवत व सरकारचे धिंडवडे काढीत त्यामुळे सरकार दरबारीही जनता पक्षाचा व पक्षाच्या आमदारांचा दबदबा होता. राज्यातील जनतेचे प्रश्न आपल्या बुलंद आवाजात स्पष्टपणे बोलणारे (तोफा) सारे जनता पक्षात होते.
        पक्ष संघटन मजबूत व्हावे म्हणून प्रत्येक पक्ष प्रयत्न करतो तसे जनता पक्षानेही ठरवले व राज्यातील जिल्ह्या जिल्ह्यात जनता पक्षाचे अध्यक्ष मा. P. K. पाटील ऊर्फ अण्णा यांनी दौरे सुरू केले होते. असाच एक दौरा विदर्भात रामटेक या ठिकाणी तत्कालीन या मतदार संघाचे जनता पक्षाचे आमदार मा. पाडूरंग हजारे यांनी आयोजित केला होता. त्या दौऱ्यात स्वतः प्रदेश अध्यक्ष मा. P. K. अण्णा, मा. आमदार हसमुख उपाध्याय, आणि माजी रेल्वे मंत्री मधु दंडवते, प्रदेश सरचिटणीस रत्नाकर महाजन यांचा समावेश होता व त्यांच्या सोबत मीही होतो. त्या वेळेस युवा जनता म्हणून युवकांची आघाडी जनता पक्षात होती. बबनराव पाचपुते अध्यक्ष व मी सरचिटणीस म्हणून काम पहायचो.
एक दिवस अगोदरच आम्ही रामटेक येथे नागपूरहुन पोहोचलो. रात्री निसर्गरम्य अश्या शासकीय विश्रामगृहात मुक्काम करून दुसऱ्या दिवशी दिवसभराचा कार्यक्रम आटोपून आम्ही माघारी मुंबई कडे निघालो. रेल्वेची परतीची तिकिटे अगोदरच काढली होती. संध्याकाळी १ तास अगोदर आम्ही सर्व रामटेक रेल्वे स्टेशनवर आलो. मा. दंडवते साहेबाना बघून TC धावत आले व आम्हास VIP विश्राम कशात बसविले. आमची तिकिटे Confirm झाली का हे बघण्यासाठी मी त्या TC सोबत त्यांच्या कार्यालयात गेलो असता आमचे एकही तिकीट confirm नव्हते ! ते बघून तो टीसी हादरलाच !  ही बातमी कार्यालयातील सर्वच टीसी ना समजली व ते धावत पळत मा. दंडवते साहेबांकडे आलेत. कन्फर्म लिस्ट मधील ४/५ तिकिटे आम्ही कॅन्सल करतो व ती तुम्हाला देतो असा पर्याय त्यांनी  साहेबांना सुचवला..त्यावर दंडवते साहेब संतापले व म्हणाले की त्या कन्फर्म झालेल्या  प्रवाशांचे काय ? त्यांचे काय चुकले ? त्यांना त्रास होईल, असे करू नका ! आम्ही बसून प्रवास करतो, परंतु आमच्यामुळे त्या प्रवाश्यांना त्रास नको. तात्पुरत्या स्वरूपात त्या ट्रेन मध्ये नागपूरपर्यंत आमची बसायची व्यवस्था टीसी नी केली व त्वरित नागपूर रेल्वे कार्यालयात फोन करून पुढची व्यवस्था करायचे सांगितले.
असे हे नाना ऊर्फ मधु दंडवते ! माजी रेल्वे मंत्री !!
नानांच्या अश्या प्रामाणिक पने वागण्याच्या अश्या बऱ्याच आठवणी आहेत ..त्यांच्या स्मृतीस अभिवादन.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here