आंभोरा येथील ‘स्टेट ऑफ आर्ट’ केबल-स्टेड पुलाचे लोकार्पण

    नागपूर – तीर्थक्षेत्र आंभोरा येथील वैनगंगा नदीवर नवनिर्मित केबल-स्टेड पूल, पुलावरील आकर्षक प्रेक्षक गॅलरी, याठिकाणी भविष्यात सुरू होणारे वॉटर स्पोर्ट्स आणि अॅडव्हेंचर स्पोर्ट्सचे उपक्रम, लाईट अँड साऊंड शो देशभरातील पर्यटकांना आकर्षित करेल. त्यातून खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री  नितीन गडकरी यांनी आज (शनिवार) येथे व्यक्त केला.

           भारत सरकारच्या रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय यांच्या सेंट्रल रोड फंड अंतर्गत  आंभोरा येथे वैनगंगा नदीवर अतिशय आकर्षक असा केबल स्टेड पूल उभारण्यात आला आहे. या पुलाचे लोकार्पण आज  नितीन गडकरी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी भंडाऱ्याचे खासदार सुनील मेंढे, रामटेकचे खासदार कृपाल तुमाने, आमदार राजू पारवे, माजी खासदार डॉ. विकास महात्मे, भंडारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष गंगाधरराव जिभकाटे, माजी आमदार सुधाकर कोहळे, माजी आमदार सुधीर पारवे, डॉ. राजीव पोतदार, श्याम बाबू दुबे, बाबा तितरमारे, चैतन्येश्वर मंदिराचे विश्वस्त श्री. ठवकर, मुख्य अभियंता दिनेश नंदनवार आदींची प्रमुख उपस्थिती होती. भंडारा व नागपूर जिल्ह्याच्या सीमेवर असलेला हा प्रकल्प स्थानिकांचे जीवन आनंददायी करणारा ठरेल, असेही  गडकरी म्हणाले. ‘केबल-स्टेड पूल हा एक स्टेट ऑफ आर्ट प्रकल्प ठरला आहे. येथील उत्तम प्रकाशयोजना, पुलाच्या मध्यभागी टॉवरवर असणारी व्हिवींग गॅलरी आणि चहुबाजुंनी असलेला निसर्ग केवळ विदर्भातीलच नव्हे तर देशातील पर्यटकांना आकर्षित करेल असा मला विश्वास आहे. देशाला अभिमान वाटेल असा हा प्रकल्प आहे. पूर्वी भंडारा जिल्ह्यातील लोक नदीतून बोटीने प्रवास करीत चैतन्येश्वर मंदिरात दर्शनासाठी यायचे. आता ही समस्या दूर झाली आहे. या पुलामुळे येथील वाहतुक सुरळीत होईल. रोजगाराची निर्मिती होईल आणि लॉजिस्टिक कॉस्ट देखील कमी होईल,’ असेही  गडकरी म्हणाले. याठिकाणी कन्हान, वैनगंगा, आम, मुर्झा आणि कोलार अशा पाच नद्यांचा संगम आहे. वैनगंगेच्या साक्षीने आद्यकवी मुकुंदराज यांनी ‘विवेक सिंधू शके’ हा ग्रंथ लिहीला. त्यामुळे या भागातील तीर्थपर्यटन, साहित्यिक इतिहास आणि नैसर्गिक सौंदर्य कायम आकर्षणाचा विषय राहिला आहे. आता एकूणच पर्यटनाच्या दृष्टीने आंभोरा भागाला महत्त्व प्राप्त होणार आहे, असेही ते म्हणाले. नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतील पर्यटन आखाडा देखील राज्य शासनाने मंजूर केला आहे. २५० कोटी रुपयांच्या या आराखड्यानुसार लवकरच कामाला सुरुवात होणार आहे.

पर्यटनाचे नवे केंद्र निर्माण होणार – श्री. देवेंद्र फडणवीस

         आंभोरा हे विदर्भातील पर्यटनाचे नवे केंद्र ठरणार आहे, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. याठिकाणी पर्यटनाच्या निमित्ताने अनेक उद्योग येतील आणि स्थानिकांनाच रोजगार देण्यात येईल, असा आमचा आग्रह असणार आहे, असेही ते म्हणाले. नितीन गडकरी यांच्या देखरेखीत केबल-स्टेड पुलाचे काम अतिशय उत्तम झाल्याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. तत्पूर्वी  नितीन गडकरी आणि  देवेंद्र फडणवीस यांनी श्री क्षेत्र आंभोरा येथील चैतन्येश्वर मंदिरात दर्शन घेतले.

असा आहे केबल-स्टेड पूल

            ७०० मीटर लांबीच्या या पुलासाठी केंद्रीय रस्ते निधीमधून (सीआरएफ) १७६ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. तर या भागातील एकूणच पर्यटन विकास व सौंदर्यीकरणासाठी राज्य सरकारच्या वतीने ३५० कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. पुलाच्या मध्यभागी ४० मीटर उंचीचे दोन टॉवर्स असून त्याच्या शीर्षभागी आकर्षक प्रेक्षक गॅलरी उभारण्यात आली आहे. येथे जाण्यासाठी पायऱ्या व लिफ्ट अशी व्यवस्था असून व्हिविंग गॅलरीच्या ठिकाणी लवकरच रेस्टॉरंट देखील सुरू होणार आहे. ३ हजार चौरस फुटांच्या या गॅलरीमध्ये एकावेळी दिडशे लोक बसू शकतात, अशी व्यवस्था आहे. पुलावर आकर्षक प्रकाशयोजना करण्यात आली असून रात्रीच्या वेळी हा नयनरम्य देखावा पर्यटकांना विशेषत्वाने आकर्षित करणार आहे.

जागोजागी जोरदार स्वागत

           केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आंभोऱ्याच्या दिशेने जाताना विविध ठिकाणी जोरदार स्वागत करण्यात आले. डोंगरगाव, कुही, मांढळ, पचखेडी, शिरकापूर, वेलतूर आदी गावांमधील नागरिकांनी तसेच शालेय विद्यार्थ्यांनी दोघांचेही हार व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here