केंद्रीय मंत्री  नितीन गडकरी यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

नागपूर –  सुभाष रोडवरील म्हाडाच्या जागेवर व्यापाऱ्यांसाठी सर्व सोयीसुविधायुक्त गारमेंट झोन तयार करावे. तसेच ही जागा गारमेंट उद्योगाचे प्रमुख केंद्र म्हणून नावारुपाला येण्याच्या दृष्टीने नियोजन करावे, अशा सूचना केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

श्री. नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीला म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल, नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. गाडीलकर, म्हाडाचे कॉन्ट्रॅक्टर बी.जी. शिर्के कंपनीचे प्रतिनिधी, हफीज कॉन्ट्रॅक्टरचे प्रतिनिधी, व्यापारी प्रतिनिधी विनय जैन, रिंकू जैन आदींची उपस्थिती होती. सुभाष मार्गावरील गीता मंदिरच्या पुढील भागात म्हाडाच्या जागेवर बहूमजली इमारत उभारण्यात येणार आहे. केवळ नागपूर नव्हे तर विदर्भातील व्यापाऱ्यांसाठी ‘गारमेंट झोन’ म्हणून ती नावारुपाला येईल. याठिकाणी व्यापाऱ्यांसाठी शोरूम्स आणि वरच्या मजल्यांवर वर्कशॉपसाठी जागा असेल. व्यापाऱ्यांना बाजारभावापेक्षा कमी दरात जागा उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश  नितीन गडकरी यांनी यावेळी दिले. या संदर्भात बैठकीला उपस्थित व्यापाऱ्यांनी सकारात्मक भूमिका दर्शवली. व्यापाऱ्यांसाठी याच ठिकाणी उत्पादने तयार करण्याची सोय असल्यामुळे महिलांनाही मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल, असेही  गडकरी म्हणाले. एकाच इमारतीत गारमेंट व्यापारी व्यवसाय करू शकणार असल्याने यामध्ये छोट्या व्यापाऱ्यांनाही आपला व्यवसाय वाढविण्याची संधी मिळणार आहे, असा विश्वास  गडकरी यांनी व्यक्त केला. संकुलाच्या डिझाईनच्या संदर्भातही मंत्री महोदयांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here