महाराष्ट्र राज्याचे प्रथम उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस समितीचे संस्थापक अध्यक्ष, व युगांतर शिक्षण संस्था नागपूर चे संस्थापक अध्यक्ष, स्व. श्री. नाशिकराव उपाख्य बाळासाहेब तिरपुडे यांच्या जयंतीप्रित्यर्थ स्व. श्री. नाशिकराव तिरपुडे जयंती समिती तर्फे दरवर्षी दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार आम्रपाली उत्कर्ष संघाचे संस्थापक, प्रख्यात समाजसेवक राम इंगोले यांना युगांतर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजकुमार तिरपुडे यांच्या हस्ते समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला. स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र व रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
गेले अनेक दशकांपासुन गंगा जमुना वस्तीतील वारांगनांच्या पाल्यांचे पालकत्व स्वीकारून त्यांच्या शिक्षणासहीत मुलभूत गरजा विमलाश्रम घरकुल व नवीन देसाई निवासी शाळेच्या माध्यमातुन राम इंगोले करीत आले आहेत. तसेच उमरेड परिसरात खडीकाम करणा-या मजुरांच्या पाल्यांना जीवनकौशल्य शिक्षण ते रविवार शाळेच्या माध्यमातुन देत आहेत.
युगांतर शिक्षण संस्थेच्या प्रांगणात पार पडलेल्या या समारंभाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष राजकुमार तिरपुडे होते. संस्थेच्या कार्याध्यक्षा वनिताताई तिरपुडे, उपाध्यक्ष कलश तिरपुडे, सरचिटणीस गणेश गौरखेडे, सचिव जयंत (बाबा) कोंबाडे, कार्यकारीणी सदस्य धनश्री तिरपुडे, इंद्रजीत आमगांवकर यांच्यासह डॉ. गोविंद वर्मा व्यासपीठावर उपस्थित होते.
सत्कारास उत्तर देतांना राम इंगोले यांनी मिळालेल्या रोख देणगी रक्कमेचा उपयोग रहिवासी शाळेतील विद्यार्थ्यांच्या विकासासाठी करण्याचा मनोदय व्यक्त केला व केलेल्या सत्काराबद्दल युगांतर शिक्षण संस्थेच्या पदाधिका-यांचे आभार व्यक्त केले.
युगांतर शिक्षण संस्थेच्या कार्याध्यक्षा वनिताताई तिरपुडे यांनी त्यांच्या भाषणात राम इंगोले हे करीत असलेल्या समाजकार्याचा गौरवपुर्ण उल्लेख करीत दचित विद्यार्थ्यांच्या जीवनात भरारी देण्याचे दुर्मिळ कार्य ते पार पाडीत असुन स्व. बाळासाहेब तिरपुडे यांना अभिप्रेत हे समाजकार्य असल्याचे प्रतिपादन केले. तत्पुर्वी गणेश गौरखेडे यांनी मानपत्राचे वाचन केले.
डॉ. अर्शिया सय्यद, यांनी कार्यक्रमाचे संचालन केले.  सचिन हुंगे यांनी राम इंगोले यांच्या समाजकार्याचा परिचय करून दिला. प्रा. दिगंबर टुले यांनी आभारप्रदर्शन केले. सर्वश्री किरण बोरकर, भाऊ भालेराव, युगांतर शिक्षण संस्थेव्दारा संचालित शैक्षणिक संस्थांचे प्राचार्य डॉ. स्वाती धर्माधिकारी, डॉ. ललित खुल्लर, डॉ. विवेक अवसरे, डॉ. अक्षय दंडाले, डॉ. सुनिल घुलाक्षे, प्रा. वेणूगोपाल नायर तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here