केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पुरस्कार वितरण

नागपूर – केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री  नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या खासदार भजन स्पर्धेची महाअंतिम फेरी शनिवार, दि. २० जानेवारी २०२४ रोजी दुपारी २ ते ४.३० या वेळेत कविवर्य श्री सुरेश भट सभागृह रेशीमबाग येथे होणार आहे.  स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा सायंकाळी साडेपाच वाजता होणार असून केंद्रीय मंत्री  नितीन गडकरी यांचे हस्ते विजेत्यांना गौरविण्यात येईल.

प्राथमिक फेरीमध्ये नागपुरातील एकूण ३४९ भजनी मंडळांनी सहभाग घेतला. जवळपास ८ हजार महिलांनी भजनाद्वारे ईश्वरभक्तीचा आनंद घेतला. महाअंतिम फेरीसाठी सर्वोतत्म १२ भजनी मंडळांची निवड करण्यात आली आहे. दक्षिण विभागातून कैलास नगर येथील गुरूमाऊली भजन मंडळ व स्वरनिनाद भजन मंडळ, मध्य विभागातून स्वरा भजन मंडळ, स्वरविहार भजन मंडळ, उत्तर विभागातून सारस्वत भजन मंडळ व नादब्रह्म भजन मंडळ,  दक्षिण पश्चिम विभागातून लक्ष्मीनगर येथील श्रीराम भजन मंडळ व सोनेगाव येथील कलाश्री भजन मंडळ, पश्चिम विभागातून सूरप्रमथिनी भजन मंडळ व खरे टाऊन येथील धरमपेठ भजन मंडळ, पूर्व विभागातून रत्नाक्षी भजन मंडळ व सुरभक्ती भजन मंडळांची महाअंतिम फेरीसाठी निवड झाली आहे. विजेत्या मंडळाला २१ हजार रुपये, उपविजेत्या मंडळाला १५ हजार रुपये, तृतीय क्रमांकाला ११ हजार रुपये, चौथ्या क्रमांकाला ७ हजार रुपये, पाचव्या क्रमांकाला ५ हजार रुपये, सहाव्या क्रमांकाला ४ हजार रुपये, सातव्या क्रमांकाला ३ हजार रुपये रोख व गौरवचिन्ह प्रदान करण्यात येईल. ५ मंडळांना प्रत्येकी २ हजार ५०० रुपये व गौरवचिन्ह असा उत्तेजनार्थ पुरस्कार देण्यात येईल. या स्पर्धेचे संयोजन डॉ. श्रीरंग वराडपांडे यांनी केले असून माया हाडे, श्रद्धा पाठक, सुरेश गुप्ता, रंजना गुप्ता, अभिजित मुळे, विश्वनाथ कुंभाळकर, भोलानाथ सहारे, वंदना कुलकर्णी, मोहन महाजन, अतुल सगुलले, लक्ष्मी राया, लता खापेकर, मनीषा दुबे, समृद्धी वराडपांडे, डॉ. अजय सारंगपुरे यशस्वी आयोजनासाठी विशेष परीश्रम घेत आहेत.

श्रीराम भक्तीची संकल्पना

२२ जानेवारीला होऊ घातलेल्या अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर ‘श्रीराम भक्ती’ ही खासदार भजन स्पर्धेची मध्यवर्ती संकल्पना ठेवण्यात आली. प्राथमिक फेरीमध्ये प्रत्येक मंडळाने दोन भजने गायली, त्यातील एक भजन श्रीराम भक्तीवर आधारित होते. महाअंतिम फेरीदेखील याच पद्धतीने होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here