केंद्रीय मंत्री ना. श्री. नितीन गडकरी : महारेल निर्मित पूर्व नागपुरातील पाच उड्डाणपुलांचे भूमिपूजन व महाराष्ट्रातील ९ उड्डाणपुलांचे लोकार्पण

नागपूर : पूर्व नागपुरातील वाहतुकीची कोंडी दूर करण्यासाठी नवीन पाच उड्डाणपुलांची मदत होणार आहे. या उड्डाणपुलांचा उपयोग जनतेला, व्यापाऱ्यांना होणार आहे. पुलांच्या दोन्ही टोकांना अपघात रोखण्यासाठी योग्य नियोजन केले जाईल, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी आज (रविवार) केले.

महारेलद्वारे निर्मित ९ उड्डाणपूलांचे लोकार्पण आणि ५ नवीन उड्डाणपूलांचे भूमिपूजन ना. श्री. नितीन गडकरी व राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. नंदनवन येथील संत गोरा कुंभार चौकात महाराष्ट्रातील विविध ठिकाणांवरील १४ विकासकामांचा सोहळा एकाचवेळी आयोजित करण्यात आला होता. यावेळी वर्धमाननगर ते निर्मलनगरी उमरेड रोड, लकडगंज पोलीस स्टेशन ते वर्धमाननगर, राजेंद्र नगर नंदनवन ते हसनबाग चौक, चंद्रशेखर आझाद चौक ते मारवाडी चौक आणि रेशीमबाग ते केडीके कॉलेज व टेलिफोन एक्स्चेंज चौक ते भांडे प्लॉट या ७९२ कोटींच्या पाच नवीन उड्डाणपुलांचे भूमिपूजन झाले. या कार्यक्रमाला खासदार कृपाल तुमाने, भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमदार कृष्णा खोपडे, आमदार विकास कुंभारे, आमदार आशिष जयस्वाल, आमदार टेकचंद सावरकर, माजी आमदार अनिल सोले, भाजपचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष संजय भेंडे, भाजप शहराध्यक्ष बंटी कुकडे, व्यापारी आघाडीचे अध्यक्ष विक्की कुकरेजा आदींची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. महारेलचे व्यवस्थापकीय संचालक राजेश कुमार जैस्वाल यांची विशेष उपस्थिती होती. ना. श्री. गडकरी यांनी नागपुरातील विकासकामांचे श्रेय जनतेला जात असल्याची भावना व्यक्त केली. ‘आम्ही नागपुरात विविध विकासकामे करू शकलो, याचे श्रेय आम्हाला किंवा कोणत्याही सरकारी यंत्रणेला जात नाही. याचे श्रेय सर्वसामान्य जनतेला जाते. जनतेने आम्हाला निवडून दिले नसते, आमच्यावर विश्वास दाखविला नसता तर ही कामे आमच्या हातून होऊ शकली नसती,’ असे ना. श्री. गडकरी म्हणाले. महारेलने तत्परतेने कामे पूर्ण केल्याबद्दल ना. श्री. गडकरी यांनी कौतुक केले. ‘३१ आरओबी केंद्र सरकारच्या फंडातून आणले, त्यातील २० पुलांचे काम मी महारेलला दिले. अतिशय कमी कालावधीत त्यांनी बहुतांश पुलांचे काम पूर्ण करून ते जनतेच्या वापरासाठी खुले केले. ही सगळी कामे दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण झाली आहेत,’ असेही ना. श्री. गडकरी म्हणाले. नागपूरचा चौफेर विकास होत असल्याचे सांगताना ते म्हणाले, ‘पूर्व नागपूरची स्थिती आधी फार वेगळी होती. आता येथील सर्व रस्ते सिमेंटचे झाले आहेत. इथे सिम्बॉयसीससारखे प्रतिष्ठित इन्स्टिट्युट आले आहे. याशिवाय लवकरच सर्व सोयीसुविधायुक्त मार्केटच्या माध्यमातून इतवारी व गांधीबागमधील वाहतुक कोंडी देखील दूर होणार आहे. मध्यवर्ती बसस्थानक व रेल्वे स्थानकाचेही रुपडे देखील पालटणार आहे. शिक्षण, आरोग्य, रोजगार, पायाभूत सुविधा या सर्वच क्षेत्रांमध्ये नागपूरचा विकास होत आहे.’

 

नागपूरचा चेहरा बदलतोय – ना. देवेंद्र फडणवीस

नागपूर शहरात आणि जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कामे झाली. गेल्या दिड वर्षांत तर पाच हजार कोटींपेक्षा जास्त रुपयांची कामे झाली. आरोग्याच्या सुविधा, पिण्याचे पाणी, उड्डाणपूल, क्रीडा संकुल, काँक्रिट रस्ते अशा सर्व प्रकारच्या कामांचा यात समावेश आहे. नागपूर शहराचा चेहरा बदलून सर्वसामान्य माणसाचे जीवन सुसह्य करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here