राज्यातील ब्राह्मण समाज स्वतंत्र परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची मागणी करीत होता व यावर दिनांक 14 डिसेंबर 2023 बुधवारला परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. ही स्वागतार्ह बाब आहे. यामुळे ब्राह्मण समाज विकासाच्या प्रवाहात येईल याचे कलाल-कलार समाज संघटना मनापासून स्वागत करते. त्याचप्रमाणे राजपूत समाजाला आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली 25 जुलै 2023 रोजी झालेल्या बैठकीत महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याबाबत तत्वतः मान्यता देण्यात आली. या अनुषंगाने 15 जानेवारीपुर्वी याबाबत निर्णय घेऊन मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव सादर केला जाईल. अशी घोषणा इतर मागास, बहुजन कल्याणमंत्री अतुल सावे यांनी दिली दिनांक 20 डिसेंबर 2023 बुधवारला केली. या दोन्ही समाजाकरीता आर्थिक विकास महामंडळ स्थापन होत आहे याचे महाराष्ट्र कलाल-कलार समाज संघटना मनापासून स्वागत करते. यामुळे दोन्ही समाजाचा विकास भरभराटीला येईल. परंतु गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्र कलाल-कलार समाज आर्थिक विकास महामंडळाची मागणी करीत आहे त्याकडे सरकारने दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते. त्यामुळे सरकारने कलाल-कलार समाजाकरीता आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यास सहकार्य करावे अशी समाजाची मागणी व विनंती आहे. कलाल-कलार समाज विकासाच्या प्रवाहात यावा या उद्देशाने दिनांक 12 डिसेंबर 2023 मंगळवारला विधानभवनावर भव्य मोर्चा नेण्यात आला. याप्रसंगी महाराष्ट्र कलाल-कलार समाज संघटनेच्या वतीने शिष्टमंडळाच्या मार्फत सन्माननीय मंत्री अतुलजी मोरेश्वर सावे( गृहनिर्माण, इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री, महाराष्ट्र राज्य) यांना भेटून निवेदन देण्यात आले यात संघटनेचे अध्यक्ष सागर समुद्रवार, सरचिटणीस संतोष खंबलवार, प्रदेश प्रवक्ता रमेश लांजेवार, श्रीकांत शिवनकर, रविंद्र हटवार, विजय उजवणे उपस्थित होते. यावेळी मंत्रीमहोदय श्री अतुलजी सावे यांनी आश्वासन दिले की आपल्या महामंडळाच्या मागणीच्या संदर्भात चर्चा करून तीन दिवसांत कळवतो. परंतु सरकारने अधिवेशन दरम्यान महाराष्ट्र कलाल-कलार समाज संघटनेच्या मागणीचा मुद्दा चर्चेलाच घेतला नाही व फक्त आश्वासन देऊन मोकळे झाले. त्यामुळे समाजाला आर्थिक विकास महामंडळ मिळाले नाही. त्याचप्रमाणे याच दिवशी समाजाचे एक शिष्टमंडळ सन्माननीय मंत्री देवेंद्रजी फडणवीस (उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य) यांना भेटले यामध्ये संघटनेचे नेता चंद्रपालजी चौकसे, माजी आमदार केशवरावजी मानकर, माजी मंत्री अविनाश वारजुरकर, जैन कलार समाज मंडळाचे माजी अध्यक्ष अनिलजी अहिरकर यांनी महामंडळाबद्दल सविस्तर चर्चा केली. परंतु नागपूर अधिवेशनात कलाल-कलार समाजाचा आर्थिक विकास महामंडळ मुद्दा मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपस्थित झालेला नाही. त्यामुळे माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, माननीय श्री अतुलजी सावे, गृहनिर्माण, इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री यांना नम्र विनंती आहे की कलाल-कलार समाजाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी ब्राह्मण व राजपूत समाजाप्रमाणे कलाल-कलार समाजाकरीता सरकारने भगवान सहस्त्रबाहू आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून समाजाच्या विकासाला चालना द्यावी. अशी मागणी महाराष्ट्र कलाल-कलार समाज संघटनेच्या वतीने सरकारला करण्यात येत आहे. त्यामुळे सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत कलाल -कलार समाजाचा विचार करावा व मराठा आरक्षणासाठी फेब्रुवारीमध्ये बोलावलेल्या विषेश अधिवेशनाच्या आधी समाजाकरीता आर्थिक विकास महामंडळ जाहिर करून महाराष्ट्र कलाल-कलार समाज संघटनेच्या मागणीकडे गांभीर्याने लक्ष केंद्रीत करून भगवान सहस्त्रबाहु आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे हीच अपेक्षा!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here