नागपूर, दि. २६ डिसेंबर २०२३ :   भारतीय मूळ असलेल्या कलेचे दोन वैशिष्ठ्य आहेत. ते म्हणजे आध्यात्मिकता आणि कल्पकता. भारतीय कला ही नेहमी आध्यात्मिक मूल्यांना अधोरेखित करते. शिवाय भारतीय कलाकारांनी नेहमीच कल्पनाशक्तीला वाव दिला आहे. ग्रामायण प्रदर्शनामध्ये जे फार प्रकाशझोतात नाहीत, अशा कलाकारांना पुढे आणून उद्योग आणि कला या दोन्हीचा समन्वय साधण्यात आला आहे. त्यामुळे भारतीय कला व संस्कृतीचे जतन आणि संवर्धन होण्यास मदत होईल, असा विश्वास समरसता गतिविधी, (राष्ट्रीय स्वयंसेवक संघ) चे अखिल भारतीय सहसंयोजक रविंद्र किरकोळे यांनी व्यक्त केला.

नागपूर येथे आयोजित ग्रामायण सेवा प्रदर्शनात वेणु शिल्पी स्व. सुनील देशपांडे विश्वकर्मा कलाकार / कारागीर दालन भरविण्यात आले आहे. यात सहभागी कलाकार आणि कारागिरांच्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी देहदान जागृतीचे सामाजिक कार्यकर्ते रमेश सातपुते होते.

रविंद्र किरकोळे पुढे म्हणाले, भारतीय कला आपल्याला जीवनाचे सार्थकत्व आणि जगाचे सौंदर्य समजून घेण्यास मदत करते. या प्रदर्शनात दाखवण्यात आलेल्या कलाकृती आध्यात्मिकदृष्ट्या समृद्ध आहेत आणि त्यात कल्पनाशक्तीचा अविष्कार दिसून येतो. त्यामुळे भारतीय कला आणि संस्कृतीचे जतन आणि संवर्धन होण्यास मदत होईल.

गडकिल्ले प्रदर्शनामुळे इतिहास आणि कलेचा प्रसार

सामाजिक कार्यकर्ते रमेश सातपुते यांनी सामाजिक जाणीव, कलेचा प्रसार आणि नागपुरात सुरु केलेल्या गडकिल्ले प्रदर्शनाची माहिती दिली. सातपुते म्हणाले की, “आम्ही नागपुरात दिवाळीमध्ये गडकिल्ले बनवा स्पर्धा आणि प्रदर्शनाची सुरवात केली. या प्रदर्शनात महाराष्ट्रातील विविध भागातील शिवकालीन गडकिल्ले  माहिती प्रदर्शित करण्यात येत असते. या प्रदर्शनामुळे लोकांना आपल्या गडकिल्ल्यांबद्दल अधिक जाणून घेता येईल आणि त्यांची ओळख वाढत असल्याचे ते म्हणाले.

यावेळी दोन्ही मान्यवर पाहुण्याच्या हस्ते कलाकार आणि कारागिरांच्या सत्कार करण्यात आला. यात बांबू आर्टमध्ये विजय काकडे, मिनल घोरपडे, नयन कणासे, हॅंडमेट वस्तूसाठी आकाश बसू, रांगोळी आर्टसाठी मेधा धर्मे, पेंटिंगसाठी राजेश मानकर, कोकोनट आर्ट महादेव साटोणे, वूड आर्ट विजय राजपूत बनकर, टाकाऊ पासून टिकाऊसाठी प्रकाश खरे, बाबू आर्टसाठी  प्रदिप पाठराबे,  तुकाराम आडे, कापडावर कलाकृतीसाठी नफीस अहमद जैदी, प्रिती मालेबार, गावकुससाठी अनंतराव भोयर, सहकार्य केल्याबद्दल स्नेहा भोयर, राजेंद्र दानी, अश्वीनी बुजोने, विशाखा राव, शालवी शंतनु इंगळे, निलेश इंगोले (आर्टिस्ट), निखील बोंडे, राजेश साळवे यांचा सत्कार करण्यात आला. प्रस्तावना संजय सराफ, कार्यक्रमाचे संचालन महादेव साटोणे यांनी केले, तर आभार किशोरजी केळापूरे यांनी मानले.

वेणु शिल्पी स्व. सुनील देशपांडे विश्वकर्मा कलाकार / कारागीर दालनामध्ये बांबू, लाकूड, कापड, काच, धातू इत्यादी विविध साहित्यातून तयार केलेली विविध प्रकारची कलाकृती आणि हस्तकला वस्तूंचे प्रदर्शन करण्यात आले आहे. या दालनात टाकाऊपासून बनवलेल्या वस्तू देखील आहेत. त्यात काचेच्या बाटलीवर नक्षीकाम, कागद, धातूचे तुकडे इत्यादी टाकाऊ वस्तूंपासून बनवलेल्या खेळणी, दागिने, सजावटीच्या वस्तू इत्यादींचा समावेश होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here