Home Breaking News Mumbai Accident : भांडूपमध्ये बेस्ट बसचा भीषण अपघात; 13 प्रवाशांना चिरडलं, 4...

Mumbai Accident : भांडूपमध्ये बेस्ट बसचा भीषण अपघात; 13 प्रवाशांना चिरडलं, 4 जणांचा मृत्यू

0
60
– भांडूप रेल्वे स्थानकाजवळील बस डेपो परिसरात रात्रीच्या सुमारास धक्कादायक घटना
– अनेक जण जखमी
मुंबई | प्रतिनिधी

मुंबईतून एक धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. भांडूप रेल्वे स्थानकाजवळील बेस्ट बस डेपो परिसरात बेस्ट बसने तब्बल 13 प्रवाशांना चिरडल्याची घटना घडली असून, यामध्ये 4 जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात 10 हून अधिक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. रात्रीच्या वेळी कामावरून घरी परतणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीत हा अपघात झाल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली.

रात्री 10 च्या सुमारास घडली घटना
प्राप्त माहितीनुसार, ही घटना मंगळवारी रात्री सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास घडली. भांडूप स्टेशन पश्चिमेकडील बस डेपो परिसरात मोठ्या प्रमाणात प्रवाशांची वर्दळ असताना, बस चालक बस रिव्हर्स घेत असताना नियंत्रण सुटले. अचानक बसने मागे जात गर्दीत उभ्या असलेल्या प्रवाशांना जोरदार धडक दिली. यामुळे अनेक प्रवासी बसखाली चिरडले गेले.
घटनेनंतर परिसरात आरडाओरडा, पळापळ सुरू झाली. स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य करत जखमींना बसखालून बाहेर काढले.
3 महिला व 1 पुरुषाचा मृत्यू
या भीषण अपघातात 3 महिला आणि 1 पुरुष अशा एकूण 4 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एका 31 वर्षीय अज्ञात महिलेचा समावेश आहे. तर प्रशांत लाड (वय 51) या प्रवाशाची प्रकृती अत्यवस्थ असल्याची माहिती समोर आली आहे. इतर जखमींवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.
पोलिस, अग्निशमन दल आणि बेस्ट प्रशासन घटनास्थळी
अपघाताची माहिती मिळताच मुंबई पोलीस, अग्निशमन दल, बेस्ट प्रशासन आणि 108 रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले. काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
बसचालक ताब्यात, तपास सुरू
या घटनेनंतर संबंधित बसचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे. निष्काळजीपणामुळे हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींच्या जबाबांवरून तपास सुरू असून, दोषी आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
या भीषण अपघातामुळे मुंबईकरांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असून, बेस्ट बसच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.