– IMD कडून शीतलहरींचा मोठा इशारा
मुंबई | प्रतिनिधी
राज्यातील थंडीचा कडाका काहीसा कमी झाला असला तरी तापमानात अजूनही गारवा कायम आहे. हवामानात सातत्याने बदल होत असून अनेक भागांत धुक्याचं प्रमाण वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) देशातील अनेक राज्यांसाठी थंडीची लाट, दाट धुके आणि तापमानात घट होण्याचा इशारा जारी केला आहे.
उत्तर भारतात हिवाळ्याचा प्रभाव अधिक तीव्र झाला असून राजधानी दिल्लीत दाट धुक्याची चादर पसरली आहे. कमी दृश्यमानतेमुळे दैनंदिन जनजीवन विस्कळीत झालं असून विमानसेवांवरही परिणाम झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.
IMD च्या अंदाजानुसार, 19 आणि 20 डिसेंबर रोजी पंजाबमध्ये, तर 19 ते 21 डिसेंबरदरम्यान हरियाणा आणि चंदीगडमध्ये पहाटेच्या वेळी दाट ते अतिदाट धुक्याची शक्यता आहे. 22 ते 25 डिसेंबरदरम्यान उत्तर प्रदेशातील काही भागांतही दाट धुकं पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. बिहार, झारखंड, ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्येही काही ठिकाणी धुक्याचा प्रभाव जाणवू शकतो. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये तीव्र थंड दिवसांची शक्यता IMD ने वर्तवली आहे.
महाराष्ट्रातील हवामान स्थिती
महाराष्ट्रात काही भागांत थंडीच्या लाटा जाणवणार असून काही भागांत कोरडं हवामान राहील.
मुंबई व उपनगरांमध्ये आकाश निरभ्र राहणार असून कमाल तापमान सुमारे 33 अंश, तर किमान तापमान 18 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील तापमानात किंचित वाढ होऊ शकते.
पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये तापमानात काही अंशांची वाढ होण्याची शक्यता असून गारवा काहीसा कमी होईल. मात्र पुण्यात सकाळच्या वेळी धुकं पडण्याची शक्यता असून किमान तापमान 10 अंश सेल्सिअसपर्यंत राहील. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे पुढील काही दिवस तापमानात आणखी घट होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
उत्तर महाराष्ट्रातही थंडीचा कडाका काहीसा कमी झाला असला तरी नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांत किमान तापमान 9 ते 10 अंशांच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे.
खराब हवेमुळे पुणे महापालिकेची कारवाई
दरम्यान, पुण्यात वाढत्या वायू प्रदूषणामुळे महापालिका प्रशासन सतर्क झालं आहे. शहरातील बांधकाम प्रकल्पांवर सेन्सर आधारित हवा गुणवत्ता तपासणी यंत्रणा बसवणं बंधनकारक करण्यात आलं आहे. ठरवून दिलेल्या निकषांनुसार मान्यताप्राप्त उत्पादकांकडूनच ही यंत्रणा बसवावी, अन्यथा कडक कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.










