Home नागपूर आंबेडकरांच्या 40 फुटांच्या पुतळ्याचे काम थांबतेच कसे?

आंबेडकरांच्या 40 फुटांच्या पुतळ्याचे काम थांबतेच कसे?

0
50
  • सामाजिक न्याय मंत्र्यांची तातडीची कारवाई

नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेंशन सेंटरमध्ये सुरू असलेली कामे नेमकी कुठे अडकली आहेत? — असा सवाल उपस्थित करत सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी आज कन्व्हेंशन सेंटरला भेट देत सर्व प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे कडक निर्देश दिले.

कामठी मार्गावरील सभागृहात आयोजित बैठकीत मंत्री शिरसाट यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 40 फुट उंच पुतळ्याचे काम आणि कन्व्हेंशन सेंटरच्या डागडुजीची कामे वेगात पूर्ण करण्यावर जोर दिला.

बैठकीला उत्तर नागपूरचे आमदार नितीन राऊत, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, बार्टीचे महासंचालक सुनील वारे, समाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ-मुंडे, समता प्रतिष्ठानचे व्यवस्थापकीय संचालक सुरेंद्र पवार, प्रादेशिक उपायुक्त प्रसाद कुळकर्णी, सहाय्यक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे, तसेच NMRDA चे अधीक्षक अभियंता संजय चिमूरकर, अभियंता आशिष तामगाडगे, नरेश लभाने आदी मान्यवर उपस्थित होते.

बैठकीत ऑडिटोरियम हॉलच्या बाल्कनीतील शीतवाहक डक्ट, कॉन्फरन्स रूममधील एअर हँडलिंग युनिट, व्हीआयपी गेस्ट रूम, डिझेल जनरेटर, एक्झिट गेटजवळील भूमिगत पाणीटाकीचे वॉटर प्रूफिंग, तसेच बेसमेंट पार्किंग यांसह अनेक प्रलंबित मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

मंत्र्यांनी स्पष्ट निर्देश दिले की, “कन्व्हेंशन सेंटरची सर्व कामे ठराविक वेळेत पूर्ण झाली पाहिजेत. पुतळ्याचे काम अडथळ्याविना मार्गी लावा.”

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे काम आणि कन्व्हेंशन सेंटरची उभारणी पूर्ण क्षमतेने सुरू ठेवण्यासाठी ही बैठक निर्णायक ठरली आहे.