– मराठवाड्याच्या राजकारणातील एक पर्व संपले
मुंबई | प्रतिनिधी
मराठवाड्याचे ज्येष्ठ आणि प्रभावी नेते, माजी केंद्रीय मंत्री व माजी राज्यपाल शिवराज पाटील चाकूरकर यांचे निधन झाले आहे. वयाच्या 90व्या वर्षी लातूर येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या निधनाची बातमी समजताच लातूर आणि मराठवाड्यासह संपूर्ण राज्यातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
कॉंग्रेसमध्ये चार दशकांहून अधिक काळ त्यांनी जबाबदाऱ्या निभावत मोठा कारकीर्द गाजवली. 35 ते 40 वर्ष खासदार म्हणून काम करत त्यांनी दिल्लीच्या राजकारणात आपली भक्कम छाप पाडली. केंद्रात विविध महत्त्वाची मंत्रिपदे, तर नंतर राज्यपालपदाची जबाबदारी त्यांनी अतिशय गांभीर्याने पार पाडली. त्यांच्या जाण्याने मराठवाडा आणि देशाच्या राजकारणातील एक महत्त्वाचा अध्याय संपल्याचे मानले जात आहे.
लातूर जिल्ह्यात शिवराज पाटील चाकूरकर यांचे प्रचंड राजकीय वर्चस्व होते. आपल्या मतदारसंघाचा आणि संपूर्ण जिल्ह्याचा विकास अधिकाधिक कसा होईल, यासाठी ते सतत आग्रही राहिले. त्यांच्या संपर्कात असलेल्या कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी त्यांच्या कार्यशैलीमुळे त्यांना नेहमीच एक प्रामाणिक, शांत आणि सर्वमान्य नेता म्हणून पाहिले. त्यांच्यामुळेच लातूर जिल्ह्यात कॉंग्रेसला एक वेगळी ताकद आणि आधार लाभला होता.
12 ऑक्टोबर 1935 रोजी चाकूर (जि. लातूर) येथे जन्मलेल्या शिवराज पाटील यांनी उस्मानिया विद्यापीठातून विज्ञान शाखेत पदवी पूर्ण केली आणि नंतर मुंबई विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण घेतले. शिक्षणानंतर त्यांनी लातूर नगरपालिकेच्या राजकारणातून सार्वजनिक आयुष्याची सुरुवात केली आणि पुढे राष्ट्रीय राजकारणापर्यंत मजल मारली.
1963 मध्ये त्यांनी विजया पाटील यांच्याशी विवाह केला. एक मुलगा आणि एक मुलगी, तसेच सून डॉ. अर्चना पाटील चाकूरकर — ज्याही राजकारणात सक्रिय — असा मोठा कुटुंबाचा आधार त्यांच्या मागे आहे. त्यांच्या निधनाने कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे.
शिवराज पाटील चाकूरकर यांनी घेतलेला शेवटचा निरोप म्हणजे एक युगाचा अंत आहे. सभ्य, समंजस आणि संयमी राजकारणाचे ते प्रतीक होते. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून निघणे अशक्य असल्याचे राजकीय व सामाजिक वर्तुळातून व्यक्त केले जात आहे.




