Home Breaking News 15 जानेवारीला महापालिकांचा रणसंग्राम

15 जानेवारीला महापालिकांचा रणसंग्राम

0
127
oplus_0

महाराष्ट्रातील 29 महापालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

– 15 जानेवारी 2026 रोजी मतदान

– 23 ते 30 डिसेंबरदरम्यान उमेदवारी अर्ज

– 16 जानेवारीला मतमोजणी; 2,869 जागांसाठी निवडणूक

मुंबई | प्रतिनिधी

महाराष्ट्रातील रखडलेल्या महापालिका निवडणुकांबाबत अखेर मोठी घोषणा झाली आहे. आज निवडणूक आयोगाने घेतलेल्या महत्त्वाच्या पत्रकार परिषदेत राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकीचा सविस्तर कार्यक्रम जाहीर करण्यात आला. या निवडणुकांमध्ये एकूण 2,869 जागांसाठी मतदान होणार आहे.

राज्यात महापालिका निवडणुका कधी होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर निवडणूक आयोगाने तारखांची अधिकृत घोषणा केल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. आयोगाच्या माहितीनुसार, या निवडणुकांसाठी 1 जुलै 2025 ची मतदार यादी वापरण्यात येणार आहे.

निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे की, उमेदवारी अर्ज ऑफलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत. तसेच निवडणूक झाल्यानंतर सहा महिन्यांच्या आत उमेदवारांना जात प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असेल.

दरम्यान, मतदारांसाठी आयोगाने ‘मताधिकार’ नावाचे विशेष अॅप तयार केले आहे. ज्या मतदारांचे नाव दुबार आहे, त्यांच्या नावासमोर डबल स्टार चिन्ह देण्यात आले आहे. दुबार नाव असलेल्या मतदारांना एकाच मतदान केंद्रावर मतदान करता येणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले. मात्र, मतदार यादीतील दुरुस्तीचा अधिकार आयोगाकडे नसल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

महापालिका निवडणुकीच्या महत्त्वाच्या तारखा

अर्ज स्वीकारणे : 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर 2025

अर्जांची छाननी : 31 डिसेंबर 2025

उमेदवारी माघार घेण्याची अंतिम मुदत : 2 जानेवारी 2026

निवडणूक चिन्ह वाटप व अंतिम उमेदवार यादी : 3 जानेवारी 2026

मतदान दिनांक : 15 जानेवारी 2026

मतमोजणी : 16 जानेवारी 2026

निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर सर्वच प्रमुख राजकीय पक्ष तयारीला लागले असून, येत्या काही दिवसांत राज्यातील महापालिका राजकारण तापण्याची चिन्हे दिसत आहेत.