Home राजकीय अखेर माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा

अखेर माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा

0
46
क्रीडा खाते काढून घेतल्यानंतर मोठी राजकीय उलथापालथ
मुंबई | प्रतिनिधी

राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत असून, मंत्री माणिकराव कोकाटे यांचे क्रीडा खाते काढून घेण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर कोकाटे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. सध्या त्यांच्या राजीनाम्याबाबतचा अंतिम निर्णय राज्यपालांकडे प्रलंबित असल्याचे सांगितले जात आहे.

शासकीय सदनिकेचा बनावट कागदपत्रांच्या आधारे लाभ घेतल्याच्या प्रकरणात माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. कनिष्ठ न्यायालयाचा हा निर्णय सत्र न्यायालयानेही कायम ठेवला, त्यामुळे कोकाटे यांना कोणताही न्यायालयीन दिलासा मिळालेला नाही. या प्रकरणात त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले असून, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, माणिकराव कोकाटे हे सध्या मुंबईतील एका रुग्णालयात दाखल असून, त्यांच्यावर शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती आहे. अटक वॉरंट जारी झाल्यानंतर ते राजीनामा कधी देणार, यावरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू होत्या.

सुरुवातीला कोकाटे यांनी राजीनामा दिल्याची माहिती समोर आली होती. मात्र, त्यानंतर त्यांनी कोणताही राजीनामा दिला नसल्याच्या चर्चांना उधाण आले. अखेर हा संभ्रम दूर झाला असून, कोकाटे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याचे स्पष्ट झाले आहे.

सदनिका घोटाळा प्रकरण कोकाटे यांच्या चांगलेच अंगलट आले असून, न्यायालयीन प्रक्रियेतूनही त्यांना दिलासा मिळालेला नाही. त्यामुळे सत्ताधारी गोटातही अस्वस्थता वाढली असून, आगामी काळात या प्रकरणाचे राजकीय पडसाद अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.