– महायुतीचा झंझावात
– महापालिका निवडणुकांचे गणित बदलणार?
नागपूर | गोपाल कडूकर
महाराष्ट्रातील नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर होताच राज्याच्या राजकारणात मोठी हालचाल सुरू झाली आहे. भाजपप्रणीत महायुतीने या निवडणुकांमध्ये राज्यभर दमदार कामगिरी करत स्पष्ट वर्चस्व प्रस्थापित केले आहे. 288 पैकी तब्बल 207 नगराध्यक्ष पदांवर महायुतीने विजय मिळवत विरोधकांना मोठा धक्का दिला आहे. या निकालांकडे आता केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक म्हणून नव्हे, तर आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांचा ‘राजकीय सेमीफायनल’ म्हणून पाहिले जात आहे.
भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तिन्ही पक्षांनी मिळून महायुतीच्या झेंड्याखाली तळागाळापर्यंत आपली ताकद सिद्ध केली आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडीला केवळ 44 नगराध्यक्ष पदांपुरतेच यश मर्यादित राहिले आहे. त्यामुळे येत्या काळात विरोधकांची रणनीती काय असेल, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
भाजपचा दबदबा, आकड्यांनीच बोलके चित्र
महायुतीतील भाजपने सर्वाधिक 117 नगराध्यक्ष आणि सुमारे 3,300 नगरसेवक निवडून आणत जवळपास 48 टक्के जागांवर वर्चस्व मिळवले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या यशाला ‘रेकॉर्ड ब्रेकिंग’ संबोधत, 2017 च्या तुलनेत दुप्पट यश मिळाल्याचे स्पष्ट केले. विकासकेंद्री धोरणे, सुशासन आणि पायाभूत सुविधांवरील भर यामुळेच जनतेने महायुतीला कौल दिल्याचा दावा सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येत आहे.
विरोधकांचे आरोप, निवडणूक प्रक्रियेवर प्रश्न
पराभव मान्य करत असतानाच महाविकास आघाडीने निवडणुकीच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या निवडणुका मुक्त आणि निष्पक्ष नसल्याचा आरोप केला आहे. उद्धव ठाकरे गटाने ‘धनशक्ती’ आणि ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप करत सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. मात्र, महायुतीने हे सर्व आरोप ठामपणे फेटाळून लावले आहेत.










