Home राजकीय युतीची घोषणा होताच भाजपाचा मास्टरस्ट्रोक!

युतीची घोषणा होताच भाजपाचा मास्टरस्ट्रोक!

0
98
– ठाकरे बंधूंना एकाच दिवशी दुहेरी धक्का
– अनेक पदाधिकाऱ्यांचा भाजपात प्रवेश
मुंबई | प्रतिनिधी

राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा होताच राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एकत्र येत आगामी महापालिका निवडणुकीसाठी युतीची घोषणा केली. मात्र, या घोषणेनंतर अवघ्या काही तासांतच भाजपाने जोरदार डाव टाकत ठाकरे बंधूंना मोठा राजकीय दणका दिला आहे.

युतीची घोषणा होत असतानाच ठाकरे गट आणि मनसेतील अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपात जाहीर प्रवेश केल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या घडामोडीमुळे ठाकरे बंधूंच्या युतीची हवा तयार होण्याआधीच भाजपाने मैदान मारल्याचे चित्र दिसत आहे.

उल्हासनगरमध्ये ठाकरे गटाला मोठा हादरा
उल्हासनगरमध्ये शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. येथील माजी उपमहापौर आणि माजी सभागृह नेते धनंजय बोडारे यांनी भाजपात प्रवेश केला आहे. त्यांच्यासोबत माजी नगरसेविका वसुधाताई बोडारे, शितलताई बोडारे तसेच ओमी कलानी गटाचे माजी नगरसेवक नाना बिराडे यांनीही भाजपचा झेंडा हाती घेतला आहे.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी या सर्वांचे पक्षात स्वागत करत भाजपाची विकासाभिमुख, पारदर्शक आणि लोककल्याणकारी धोरणेच या प्रवेशामागील प्रेरणा असल्याचे सांगितले. यावेळी आमदार कुमार आयलानी, उल्हासनगर भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश वधारिया यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

पनवेलमध्ये मनसेची पडझड
दुसरीकडे पनवेलमध्येही मनसेला मोठा धक्का बसला आहे. मनसेचे पनवेल महानगर संघटक तानाजी पिसे, नवीन पनवेल शहराध्यक्ष प्रथमेश गवळी, विद्यार्थी सेनेचे विभाग अध्यक्ष रोहन गवळी तसेच पदाधिकारी केनेथ देवासगयम यांनी भाजपात प्रवेश केला आहे.
या प्रवेशाबाबत माहिती देताना रविंद्र चव्हाण यांनी भाजपाची डबल इंजिन सरकारची विकासनीती, मजबूत नेतृत्व आणि स्पष्ट भूमिका यामुळेच मनसेतील पदाधिकारी भाजपाकडे आकर्षित होत असल्याचे सांगितले.
युतीसमोर आव्हान वाढले
एकीकडे ठाकरे बंधूंनी महायुतीविरोधात एकत्र येण्याचा निर्णय घेतला असला, तरी दुसरीकडे त्यांच्या पक्षांतील पदाधिकाऱ्यांचा भाजपाकडे ओघ सुरू झाल्याने या नव्या युतीसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही राजकीय उलथापालथ अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
राज्यातील राजकारण आता नव्या वळणावर आले असून, पुढील काही दिवसांत आणखी कोणते मोठे चेहरे पक्षांतर करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.