Home देश विदेश बांगलादेशात हिंदूंविरोधातील हिंसाचार थांबेना; राजबाडीत अमृत मंडलची जमावाकडून हत्या

बांगलादेशात हिंदूंविरोधातील हिंसाचार थांबेना; राजबाडीत अमृत मंडलची जमावाकडून हत्या

0
42
अवघ्या काही दिवसांत दुसरा बळी
ढाका | प्रतिनिधी

बांगलादेशात हिंदू समाजावर होणाऱ्या हिंसाचाराच्या घटना थांबण्याचं नाव घेत नाहीयेत. काही दिवसांपूर्वी मयमनसिंह येथे दीप चंद्र दास या हिंदू तरुणाची जमावाकडून हत्या झाल्यानंतर आता राजबाडी जिल्ह्यात आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अमृत मंडल उर्फ सम्राट (वय २९) या हिंदू तरुणावर जमावाने अमानुष हल्ला करून त्याची हत्या करण्यात आली आहे.

ही घटना राजबाडी जिल्ह्यातील पांग्शा परिसरात घडली असून पांग्शा मॉडेल पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक नागरिकांनी अमृत मंडल याच्यावर जबरदस्तीने वसुली करत असल्याचा आरोप केला होता. या आरोपानंतर संतप्त जमावाने त्याला बेदम मारहाण केली. या हल्ल्यात अमृत मंडल गंभीर जखमी झाला असून उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
पोलिस रेकॉर्डनुसार, अमृत मंडल हा ‘सम्राट वाहिनी’ नावाच्या एका स्थानिक संघटनेचा नेता होता. मात्र या घटनेमागील नेमकी पार्श्वभूमी आणि आरोपांची सत्यता तपासली जात असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
दरम्यान, बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटना वाढतच चालल्या आहेत. चटगावमधील राउजान परिसरात मंगळवारी एका हिंदू व्यक्तीच्या घराला आग लावण्यात आली. ही एकमेव घटना नसून, गेल्या पाच दिवसांत या परिसरातील सात हिंदू कुटुंबांची घरं जाळण्यात आली आहेत. या प्रकरणी आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

याआधी गेल्या आठवड्यात मयमनसिंह शहरात २८ वर्षीय दीप चंद्र दास या तरुणाची जमावाकडून हत्या करण्यात आली होती. तो एका खासगी फॅक्टरीत काम करत होता. त्याच्यावर ईशनिंदेचा आरोप करत जमावाने त्याच्यावर हल्ला केला होता, ज्यात त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती.
दीप चंद्र दासच्या हत्येनंतर बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद यूनुस यांनी मृत तरुणाच्या कुटुंबाची जबाबदारी सरकार घेईल, अशी घोषणा केली होती. मात्र त्या घटनेला अवघे काही दिवस उलटले असतानाच अमृत मंडलच्या हत्येने पुन्हा एकदा बांगलादेशातील अल्पसंख्याकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

सलग दुसऱ्या हिंदू तरुणाच्या जमावाकडून झालेल्या हत्येमुळे बांगलादेशात पुन्हा एकदा तणावपूर्ण वातावरण निर्माण होण्याची शक्यता असून, आंतरराष्ट्रीय स्तरावरही या घटनांचे पडसाद उमटण्याची चिन्हे आहेत.