Home निवडणूक 2026 महापालिका रणधुमाळीला वेग! फक्त 48 तास शिल्लक

महापालिका रणधुमाळीला वेग! फक्त 48 तास शिल्लक

0
57
– उमेदवारांची धाकधूक वाढली
– पुणे-नागपूर-मालेगावमध्ये किती अर्ज? 
Municipal Election Update | नागपूर

राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांची धावपळ वाढली असून, पक्षांच्या अधिकृत उमेदवार याद्यांबाबत असलेली अनिश्चितता हीच सध्या सर्वात मोठी डोकेदुखी ठरत आहे. अर्जांची विक्री विक्रमी झाली असली तरी प्रत्यक्ष अर्ज दाखल करताना उमेदवार सावध पवित्रा घेत असल्याचे चित्र राज्यभर दिसत आहे.

अर्जांची विक्री प्रचंड, प्रत्यक्ष अर्ज मात्र कमी
पुणे, नागपूर आणि मालेगाव या प्रमुख महापालिकांमध्ये उमेदवारी अर्जांच्या विक्रीचा आकडा हजारोंच्या घरात गेला आहे. मात्र, प्रमुख राजकीय पक्षांकडून अद्याप ए-बी फॉर्म आणि अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर न झाल्याने इच्छुकांनी ‘थांबा आणि पहा’ अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे शेवटच्या दोन दिवसांत अर्ज भरण्यासाठी प्रचंड गर्दी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पुणे | 9 हजारांहून अधिक अर्ज विक्री, फक्त 38 अर्ज दाखल
पुणे महानगरपालिकेत आतापर्यंत 9,171 पेक्षा अधिक अर्जांची विक्री झाली आहे. मात्र, शनिवार अखेर फक्त 38 उमेदवारांनी प्रत्यक्ष अर्ज दाखल केले आहेत.
उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख मंगळवार, 30 डिसेंबर आहे. आज रविवार सुट्टी असल्याने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. त्यामुळे सोमवार आणि मंगळवार हे केवळ दोनच दिवस शिल्लक आहेत.
महाविकास आघाडी आणि महायुतीकडून अधिकृत उमेदवारांची यादी अजूनही गुलदस्त्यात असल्याने इच्छुकांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. वेळेआधी नावे जाहीर केल्यास बंडखोरी होण्याची भीती पक्ष नेतृत्वाला सतावत असल्याने सावधगिरी बाळगली जात आहे.
दरम्यान, भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात आंदेकर कुटुंबीयांनी दाखल केलेल्या अर्जात त्रुटी आढळल्याने तो स्वीकारण्यात आला नाही. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून पुन्हा अर्ज दाखल करावा लागणार आहे.
नागपूर | 151 जागांसाठी केवळ 21 अर्ज
नागपूर महानगरपालिकेतील 151 जागांसाठी आतापर्यंत केवळ 21 अर्ज दाखल झाले आहेत. हे अर्ज प्रामुख्याने अपक्ष आणि लहान पक्षांचे आहेत. प्रमुख पक्षांनी अद्याप ए-बी फॉर्म न दिल्याने अनेक मातब्बर इच्छुक वेटिंगवर आहेत.
सोमवारपासून अर्ज दाखल करण्यासाठी मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता, निवडणूक कार्यालयात अतिरिक्त खिडक्या सुरू करण्यासह पोलीस बंदोबस्त वाढवण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे.
मालेगाव | 84 जागांसाठी जोरदार राजकीय संघर्ष
मालेगाव महापालिकेच्या 84 जागांसाठी निवडणूक रणसंग्राम रंगू लागला आहे. आतापर्यंत 1,381 अर्जांची विक्री झाली असून यातून महापालिकेला 2.62 लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे. सध्या 718 इच्छुक निवडणूक रिंगणात असल्याचे चित्र आहे.

 

समाजवादी पक्ष, काँग्रेस आणि AIMIM यांनी काही जागांवर उमेदवार जाहीर केले असले तरी शिवसेना-भाजप युतीबाबत अंतिम निर्णय न झाल्याने मालेगावचा राजकीय पेच अजूनही कायम आहे.
शेवटच्या 48 तासांत काय घडणार?
अर्ज भरण्याच्या अंतिम टप्प्यात पक्षांचे निर्णय, बंडखोरी, अपक्ष उमेदवारांची गर्दी आणि प्रशासनावरचा ताण — या सर्व घडामोडींमुळे येत्या दोन दिवसांत महापालिका निवडणूक रणधुमाळी अधिक रंगणार हे निश्चित आहे.