Home Breaking News भारत अंडर-19 वर्ल्ड कप चॅम्पियन!

भारत अंडर-19 वर्ल्ड कप चॅम्पियन!

0
62
इंग्लंडवर 100 धावांनी दणदणीत विजय
हरारे | प्रतिनिधी

आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया अंडर-19 ने इतिहास रचला आहे. आयसीसी अंडर-19 वर्ल्ड कप 2026 च्या अंतिम सामन्यात भारताने इंग्लंडवर एकतर्फी विजय मिळवत सहाव्यांदा विश्वविजेतेपद पटकावले आहे. हरारे स्पोर्ट्स क्लबमधील स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या अंतिम सामन्यात भारताने इंग्लंडचा 100 धावांनी पराभव केला.

प्रथम फलंदाजी करत भारताने वैभव सूर्यवंशीच्या स्फोटक शतकाच्या जोरावर इंग्लंडसमोर 412 धावांचे विशाल आव्हान उभे केले. वैभव सूर्यवंशीने केलेली 175 धावांची अफलातून खेळी ही सामन्याचा निर्णायक टर्निंग पॉईंट ठरली. भारतीय फलंदाजांनी इंग्लंडच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवत निर्धारित 50 षटकांत मोठी धावसंख्या उभारली.

विजयासाठी 413 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचा डाव भारतीय गोलंदाजांसमोर पूर्णपणे कोलमडला. भारताच्या प्रभावी आणि शिस्तबद्ध गोलंदाजीसमोर इंग्लंडला पूर्ण 50 षटकेही खेळता आली नाहीत. इंग्लंडचा संघ अवघ्या 40.2 षटकांत 311 धावांवर सर्वबाद झाला.

या विजयासह भारताने अंडर-19 वर्ल्ड कप ट्रॉफीवर सहाव्यांदा आपले नाव कोरले आहे. विशेष म्हणजे इंग्लंडविरुद्ध अंतिम सामना जिंकत अंडर-19 वर्ल्ड कप जिंकण्याची भारताची ही एकूण दुसरी वेळ ठरली आहे. यापूर्वी 5 फेब्रुवारी 2022 रोजी भारताने इंग्लंडचा पराभव करत पाचव्यांदा वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकली होती.

आयुष म्हात्रेचे नेतृत्व, वैभव सूर्यवंशीची ऐतिहासिक खेळी आणि भारतीय गोलंदाजांची धारदार कामगिरी यामुळे हा विजय अधिकच संस्मरणीय ठरला आहे. या यशामुळे भारतीय क्रिकेटच्या उज्ज्वल भविष्यास पुन्हा एकदा दुजोरा मिळाला आहे.