मुंबई | विशेष प्रतिनिधी
BMC Election 2026: मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप–शिंदे गटाला काठावरचे बहुमत मिळाल्यानंतर आता मुंबईचा पुढील महापौर कोण होणार, यावरून राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. महापौरपदासाठी भाजप, शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात रस्सीखेच सुरू असून, पडद्यामागे गुप्त वाटाघाटी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, ठाकरे गटाकडून शिंदे गटाच्या काही नगरसेवकांशी संपर्क साधण्यात आल्याची कुणकुण लागली आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पक्षाचे सर्व 29 नगरसेवक वांद्रे येथील ताज लँड्स एन्ड या पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवले असल्याचे समजते. महापालिकेत सत्तास्थापना होईपर्यंत हे नगरसेवक हॉटेलमध्येच राहणार असल्याची चर्चा आहे.
दरम्यान, भाजपकडे 89 नगरसेवक असल्याने बीएमसीतील सत्ता स्थापन करण्यासाठी 114 चा ‘मॅजिक फिगर’ गाठणे भाजपसाठी शक्य नाही. त्यामुळे शिंदे गटाची भूमिका निर्णायक ठरणार आहे. हीच संधी ओळखून एकनाथ शिंदे यांच्याकडून भाजपसमोर अडीच-अडीच वर्षे महापौरपदाची समान वाटणी करण्याचा प्रस्ताव मांडला जाऊ शकतो, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. यासोबतच स्थायी समिती व इतर महत्त्वाच्या समित्यांमध्ये शिवसेना (शिंदे गट) नगरसेवकांना योग्य प्रतिनिधित्व देण्याची मागणीही केली जाऊ शकते.
या सगळ्या घडामोडी सुरू असतानाच उद्धव ठाकरे यांनी केलेल्या सूचक वक्तव्यामुळे राजकीय तापमान आणखी वाढले आहे. “देवाच्या मनात असेल तर मुंबईचा महापौर शिवसेनेचाच होईल,” असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केल्याचे सांगितले जाते. यामुळे शिंदे गटातील नगरसेवकांमध्ये हालचाली वाढल्या असून, काही नगरसेवकांनी उद्धव ठाकरे यांच्या जवळच्या व्यक्तींशी संपर्क साधल्याची माहिती ‘द न्यू इंडियन एक्स्प्रेस’ने दिली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या दाव्होस येथील आर्थिक परिषदेसाठी परदेशात असल्याने या काळात राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच मुंबई महापालिकेतील सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या या हालचालींमुळे मुंबईच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.




