हिवाळी अधिवेशनात जोरदार मुद्दा उभा राहणार!
नागपूर : राज्यातील धडाडीचे आणि वादाच्या भोवऱ्यात वारंवार सापडलेले आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या विरोधात हिवाळी अधिवेशनात (Maharashtra Winter Session Nagpur 2025) भाजप आमदार निलंबनाची मागणी करणार असल्याची माहिती मिळत आहे. विशेष लक्षवेधी सूचनेद्वारे हा मुद्दा सभागृहात जोरदारपणे उपस्थित केला जाणार आहे.
मुंढे नागपूर महापालिकेचे आयुक्त असताना त्यांनी स्मार्ट सिटी प्रकल्पाचा कार्यभार नियमबाह्यरीत्या घेतल्याचा आरोप भाजपने केला आहे. शासनाकडून त्यांच्या नियुक्तीबाबत कोणतेही आदेश नसताना त्यांनी स्मार्ट सिटी प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम सुरू केल्याचा दावा भाजप आमदारांनी केला आहे.
भाजपाचे नेमके आरोप काय?
1) नियमबाह्य आर्थिक व्यवहार
स्मार्ट सिटीचे सीईओ म्हणून काम करताना काही ‘पसंतीच्या’ कंत्राटदारांना कोट्यवधी रुपयांचे पेमेंट नियमबाह्य पद्धतीने केल्याचा आरोप.
2) महिला अधिकाऱ्यांशी दुर्व्यवहार
काही महिला अधिकाऱ्यांना दमदाटी केल्याचे प्रकरणही पुढे आले होते.
3) एफआयआर असूनही कारवाई नाही
या दोन्ही मुद्द्यांवर तेव्हा पोलिसांकडे एफआयआर दाखल झाले होते. मात्र, महाविकास आघाडी सरकारच्या काळात राजकीय दबावामुळे गुन्ह्यांची कारवाई पुढे सरकली नाही, असा आरोप भाजपचा आहे. आता ही दोन्ही प्रकरणे पुन्हा उचलून मुंढे यांच्या निलंबनाची मागणी होणार आहे.
तुकाराम मुंढे : कामामुळे कौतुक, पण सत्ता मात्र नाराज
तुकाराम मुंढे यांची ओळख धडाडीचे, नियमप्रिय आणि तडफदार अधिकारी अशी आहे. ते कुठेही कामाला लागले की नियमांवर आधारित निर्णय घेतात, ज्यामुळे राजकीय नेतृत्वाला त्यांची शैली अनेकदा ‘अडथळा’ वाटते. त्यामुळेच त्यांच्या बदलींची संख्या राज्यात चर्चेचा विषय ठरते.
-
2005 बॅचचे आयएएस अधिकारी
-
20 वर्षांत तब्बल 24 बदल्या — प्रशासनातील ‘रेकॉर्ड’ म्हणावा असा आकडा
-
ऑगस्ट 2025 मध्ये नुकतीच नवी बदली— दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव म्हणून नियुक्ती
तीन वर्षांच्या कालावधीऐवजी अनेकदा वर्षभरातच त्यांची बदली होते, हेही राजकीय-पद्धतींच्या संघर्षाचे चित्र स्पष्ट करते.
भाजप आमदारांनी अबोल राहिलेल्या जुन्या प्रकरणांना अधिवेशनात पुन्हा उजाळा देण्याची तयारी केल्याने हिवाळी अधिवेशनात तुकाराम मुंढे यांचा मुद्दा मोठा वादग्रस्त ठरणार हे निश्चित आहे.










