Home महाराष्ट्र कष्टकऱ्यांचा आधारवड हरपला; ज्येष्ठ समाजवादी नेते डॉ. बाबा आढाव यांचे निधन

कष्टकऱ्यांचा आधारवड हरपला; ज्येष्ठ समाजवादी नेते डॉ. बाबा आढाव यांचे निधन

0
63

पुणे : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, शेतकरी-कामगारांचे नेते आणि समाजवादी विचारांचे पुरस्कर्ते डॉ. बाबा आढाव (95) यांचे आज रात्री 8.25 वाजता निधन झाले. गेल्या काही महिन्यांपासून ते आजारी होते. प्रकृती खालावल्याने त्यांना काही दिवसांपूर्वी पुणे (Pune) येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अभिजित वैद्य आणि तज्ज्ञ डॉक्टर्स यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने कष्टकऱ्यांसाठी लढणारा लढवय्या नेता हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

दोन दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी हॉस्पिटलमध्ये भेट देऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती.

शेवटचा निरोप उद्या

बाबा आढाव यांचे पार्थिव उद्या सकाळी 10 वाजता हमाल भवन, मार्केटयार्ड येथे अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. सायंकाळी 4 ते 5 च्या दरम्यान अंत्यसंस्कार होणार आहेत.

कोण होते बाबा आढाव?

1970 च्या दशकात बाबा आढाव पुणे महापालिकेचे नगरसेवक होते. ते तात्कालीन समाजवादी पक्षाचे सक्रिय सदस्य होते. रिक्षा पंचायतीचे नेते म्हणून त्यांनी मोठे कार्य केले तसेच ‘एक गाव, एक पाणवठा’ या सामाजिक क्रांतीकारी मोहिमेचे ते प्रणेते होते. समाजातील वंचित, पीडित, कष्टकरी वर्गासाठी आयुष्यभर लढणारा हा लढवय्या नेता म्हणून त्यांची ओळख होती.

९३व्या वर्षीही आंदोलनात सक्रिय

राज्यातील अस्थिर राजकीय परिस्थिती, सत्तेसाठी होणारी राजकीय फूट यांवर त्यांनी निर्भीडपणे टीका केली होती.
“माणूस सकाळी कुठं आणि संध्याकाळी कुठं असेल… कारण सत्तेची भूक प्रचंड आहे. पण 140 कोटी जनता ठरवेल कोणाचं काय करायचं,” असे वक्तव्य त्यांनी राष्ट्रवादीतील फुटीनंतर केले होते.

वयाच्या ९३ वर्षांनंतरही त्यांनी आंदोलनात सहभागी होत समाजातील अन्यायाविरुद्ध आवाज उठवला होता.
“काळ कठीण आहे, काळाचे भान ठेवा,” असा सावधगिरीचा इशाराही त्यांनी दिला होता.