Home Breaking News मोठा खळबळजनक दावा! अजित पवारांचा मृत्यू अपघात की घातपात? रोहित पवारांनी पुराव्यांसह...

मोठा खळबळजनक दावा! अजित पवारांचा मृत्यू अपघात की घातपात? रोहित पवारांनी पुराव्यांसह बोट दाखवले थेट ‘पायलट’वर

0
126
मुंबई | प्रतिनिधी

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती येथील विमान अपघाताने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला होता. मात्र, आता या प्रकरणाला एक नवीन आणि अत्यंत धक्कादायक वळण मिळाले आहे. अजित पवार यांचा तो अपघात नसून तो एक ‘नियोजित घातपात’ असल्याचा खळबळजनक दावा त्यांचे पुतणे आणि आमदार रोहित पवार यांनी केला आहे. आज मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी काही तांत्रिक मुद्द्यांकडे लक्ष वेधत थेट वैमानिकाच्या (पायलट) भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

विमानात इंधनाचा साठा जास्त का होता? रोहित पवारांचा सवाल

रोहित पवार यांनी या अपघातामागील संशयास्पद बाबी मांडताना विमानाच्या ‘फ्यूल टँक’वर बोट ठेवले. ते म्हणाले, “विमान मुंबईहून बारामतीला निघाले तेव्हा इंधन टाक्या पूर्ण भरलेल्या होत्या. खरं तर बारामतीला पोहोचण्यासाठी एवढ्या इंधनाची गरज नव्हती. जर विमान पुढे हैद्राबादला जाणार होते, तर तिथेही इंधन भरता आले असते. महाराष्ट्रापेक्षा गुजरातमध्ये इंधन स्वस्त असतानाही, मुंबईतच पूर्ण टँक का भरण्यात आले? विमानात जितके जास्त इंधन, तितका मोठा स्फोट होतो, हे गणित लक्षात घेऊनच हे पाऊल उचलले गेले का?”

‘पायलटच्या मदतीनेच झाला घातपात’

रोहित पवार यांनी यावेळी अत्यंत गंभीर आरोप केला. ते म्हणाले की, “हा अपघात नसून पायलटच्या मदतीने घडवून आणलेला घातपात असावा, अशी दाट शंका आहे. विमानाचा ब्लॅक बॉक्स हा इंधन टाकीच्या जवळ असतो. अपघात झाला तेव्हा विमान रनवेवर न पडता बाजूला कडक जमिनीवर आदळले. ज्या पद्धतीने स्फोट झाला आणि त्यानंतर लागोपाठ जे स्फोट झाले, ते पाहता यामागे मोठे षडयंत्र असण्याची शक्यता नाकारता येत नाही.”

घटनेचा घटनाक्रम आणि संशयाची सुई

२८ जानेवारी रोजी मुंबईहून बारामतीकडे सभेसाठी जात असताना अजित पवार यांचे विमान बारामती विमानतळाजवळ एका बाजूला कलले आणि कोसळले. या भीषण दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह:

  • विदीप जाधव (सुरक्षारक्षक)

  • सुमीत कपूर (पायलट)

  • शांभवी पाठक

  • पिंकी माली (फ्लाईट अटेंडंट) या पाच जणांचा मृत्यू झाला होता.

राजकीय वर्तुळात खळबळ

गेल्या आठवड्यात दिल्ली आणि मुंबईत पत्रकार परिषदा घेतल्यानंतर रोहित पवारांनी आज मांडलेले नवे मुद्दे या प्रकरणाचा तपास सीबीआय किंवा उच्चस्तरीय समितीकडे देण्याची मागणी जोर धरू शकते. अजित पवारांच्या पक्षातील नेत्यांनीही यापूर्वी घातपाताची शंका व्यक्त केली होती, मात्र रोहित पवारांनी थेट तांत्रिक पुरावे आणि लॉजिक मांडल्यामुळे आता सरकारवर दबाब वाढण्याची शक्यता आहे.

हा अपघात की राजकीय हत्या? रोहित पवारांच्या या दाव्यामुळे आता राज्याच्या राजकारणात कोणत्या नव्या ठिणग्या पडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.