Home Breaking News ज्येष्ठ पटकथालेखक सलीम खान रुग्णालयात दाखल; प्रकृती स्थिर, २४ तास निरीक्षणाखाली

ज्येष्ठ पटकथालेखक सलीम खान रुग्णालयात दाखल; प्रकृती स्थिर, २४ तास निरीक्षणाखाली

0
111
मुंबई | विशेष प्रतिनिधी

हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज पटकथालेखक सलीम खान यांची प्रकृती बिघडल्याने आज सकाळी साडे आठच्या सुमारास त्यांना मुंबईतील लिलावती रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. त्यांना इमर्जन्सी विभागात आणण्यात आले असून प्राथमिक उपचारांनंतर तिसऱ्या मजल्यावरील आयसीयूत हलवण्यात आले आहे.

रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार सलीम खान यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. पुढील २४ तास त्यांना डॉक्टरांच्या कडक निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. त्यांच्यावर प्रसिद्ध डॉक्टर डॉ. जलील पारकर यांच्या नेतृत्वाखाली उपचार सुरू असून मेडिकल टीममध्ये न्यूरोलॉजिस्ट डॉ. नितीन डांगे आणि डॉ. बिनीत आहलुवालिया यांचाही समावेश आहे.

कुटुंबियांच्या विनंतीनुसार सध्या अधिक तपशील देण्यात आलेला नाही. मात्र उद्या सकाळी ११ वाजता कुटुंबियांच्या संमतीने अधिकृत मेडिकल बुलेटीन जारी केले जाऊ शकते.

सलीम खान यांचे पुत्र सुपरस्टार सलमान खान, मुलगी अलवीरा अग्निहोत्री तसेच कुटुंबातील इतर सदस्य बातमी कळताच रुग्णालयात दाखल झाले. सर्वांच्या चेहऱ्यावर चिंता दिसून येत होती. दरम्यान, चाहत्यांकडून सलीम खान यांच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली जात आहे.

सलीम–जावेद जोडीचा सुवर्णकाळ

मध्य प्रदेशातील इंदूर येथे १९३५ साली जन्मलेल्या सलीम खान यांनी १९६४ मध्ये सुशीला चरक (सलमा खान) यांच्याशी विवाह केला. पुढे त्यांनी अभिनेत्री हेलन यांच्याशीही विवाह केला. सलमान, अरबाज, सोहेल आणि अलवीरा ही त्यांची मुले असून अर्पिता हिला त्यांनी दत्तक घेतले आहे.

सलीम खान आणि जावेद अख्तर या जोडीने हिंदी चित्रपटसृष्टीला शोलेसह अनेक गाजलेले चित्रपट दिले. या जोडीने सिनेसृष्टीचा इतिहास घडवला, मात्र पुढे ही यशस्वी भागीदारी तुटली.

सध्या संपूर्ण चित्रपटसृष्टीचे लक्ष सलीम खान यांच्या प्रकृतीकडे लागले असून उद्याच्या मेडिकल बुलेटीनकडे सर्वांचे लक्ष आहे.