– पुतिन–मोदी समीकरणामुळे जगाचे गणित बिघडले?
नागपूर | खास प्रतिनिधी
आंतरराष्ट्रीय राजकारणात वादळ उठवणारी एक मोठी घडामोड समोर आली आहे. अमेरिकेच्या प्रचंड टॅरिफ दबावानंतरही भारतानं रशियाकडून तेल खरेदी ‘ऐतिहासिक’ पातळीवर नेली आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी वारंवार दावा केला होता की भारत रशियापासून दूर जाणार आहे, तेल खरेदी कमी करणार आहे; पण भारताने उलट त्यांचे सर्व अंदाज खोटे ठरवत जागतिक बाजाराला धक्का देणारा निर्णय घेतला आहे.
नवीन शिप-ट्रॅकिंग डेटानुसार डिसेंबर महिन्यात भारतानं रशियाकडून विक्रमी तेल आयात केली असून, ही गेल्या सहा महिन्यांतील सर्वाधिक खरेदी ठरली आहे. एवढंच नाही तर समुद्री मार्गाने रशियन तेल आयात करणारा जगातील सर्वात मोठा देश म्हणून भारताने चीनलाही मागे टाकले आहे — आणि हे अशा काळात घडत आहे, जेव्हा अमेरिकेनं भारतीय वस्तूंवर तब्बल 50 टक्क्यांपर्यंत टॅरिफ लावून आर्थिक दडपण वाढवले आहे.
अमेरिकेचा उद्देश स्पष्ट होता — भारतानं रशियाकडून तेल खरेदी थांबवावी. पण भारताने आर्थिक आणि ऊर्जा सुरक्षेच्या प्राधान्याने घेतलेला निर्णय अमेरिकेच्या रणनीतीला मोठा धक्का मानला जातो. पुतिन यांच्या अलीकडील भारत दौऱ्यानंतर या खरेदीत वाढ झाल्याचे संकेत मिळत आहेत. पुतिन यांनी स्वतः जाहीर केले होते की भारताला तेलाचा पुरवठा “कधीही आणि कोणत्याही परिस्थितीत” कमी पडू दिला जाणार नाही.
दरम्यान, अमेरिकेनं लावलेल्या अतिरिक्त 25 टक्के टॅरिफमुळे भारतीय वस्तूंवर लागू होणारा कर तब्बल 50 टक्क्यांपर्यंत गेला आहे. पण तरीही भारताच्या रशियन तेलखरेदीचा वेग मंदावलेला नाही. उलट, मागील तीन महिन्यांपासून तेल आयात सतत वाढत असून, रशियासोबतचे भारताचे ऊर्जा संबंध अधिक दृढ होत असल्याचं स्पष्ट होत आहे.
जागतिक पटलावर भारताच्या या निर्णयाचे पडसाद जाणवत आहेत. अमेरिकेची अस्वस्थता, चीनची जागा भारतानं घेणं आणि रशियाचा भारतावरचा वाढता विश्वास — या तिन्ही गोष्टींमुळे पुढील काही आठवड्यांमध्ये भू-राजकीय समीकरणे अजून तापण्याची चिन्हे दिसत आहेत.










