Home राजकीय फडणवीस टप्प्याटप्प्याने गेम खेळतायत!

फडणवीस टप्प्याटप्प्याने गेम खेळतायत!

0
50
– संजय राऊतांचा खळबळजनक आरोप
– कोकाटेंना वाचवण्याचा प्रयत्न सुरूच 
मुंबई | प्रतिनिधी

राज्याच्या राजकारणात सुरू असलेल्या उलथापालथींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. माणिकराव कोकाटे प्रकरण, मंत्रिमंडळातील घडामोडी, धनंजय मुंडेंची अमित शाह यांच्याशी भेट आणि आगामी महापालिका निवडणुका—या सर्व मुद्द्यांवर राऊतांनी सरकारला धारेवर धरत “फडणवीस टप्प्याटप्प्याने गेम करतील आणि शेवटचा घाव मिंध्यांवरच घालतील” असा सूचक इशारा दिला.

अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील ‘माणिक मोती गळाला’

माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यावर भाष्य करताना राऊत म्हणाले की, अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील माणिक मोती गळाल्याने सरकार उघडं पडलं आहे. मंत्रिमंडळातील एकाच गटाचे दोन मंत्री भ्रष्टाचार आणि गुंडगिरीच्या आरोपांमुळे गेले, ही या सरकारला लागलेली काळीमा असल्याचा आरोप त्यांनी केला.

कोकाटेंना वाचवण्याचा प्रयत्न शेवटपर्यंत?

कोकाटे प्रकरणावर बोलताना संजय राऊत यांनी गंभीर आरोप केले.
“कोकाटेंना वाचवण्याचा प्रयत्न शेवटपर्यंत सुरू आहे. सरकार या प्रकरणातून संदेश देत आहे की, आम्ही भ्रष्टाचाऱ्यांच्या पाठीशी उभे राहतो. आमच्या पक्षात या, पूर्ण संरक्षण मिळेल – हाच संदेश दिला जात आहे,” असा आरोप त्यांनी केला.

धनंजय मुंडे – अमित शाह भेटीवरून टीका

धनंजय मुंडे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची घेतलेली भेट संशयास्पद असल्याचा आरोप करत राऊत म्हणाले,
“वाल्मिक कराड अजूनही तुरुंगात आहे, खटला संपलेला नाही. अशा वेळी ज्यांच्यावर गंभीर आरोप आहेत त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्याचं पाप फडणवीस करतील असं मला वाटत नाही. मात्र, या भेटीतून ‘काही करा आणि आमच्याकडे या’ हाच संदेश दिला जात आहे. महाराष्ट्रात फडणवीस आणि दिल्लीत अमित शाह हा संदेश देत आहेत.”

शिंदे गटाचं भवितव्य धोक्यात?

“पुढे शिंदेंचा पक्ष अस्तित्वात राहील का?” असा थेट सवाल उपस्थित करत राऊतांनी महायुतीतील अंतर्गत संघर्षावर बोट ठेवलं.
“शिंदे गटाचे असे असंख्य मंत्री आहेत. त्यांना तात्काळ बरखास्त करायला हवे. पैशांच्या बॅगा दिसत आहेत.” असा घणाघात त्यांनी केला.

मुंबईचा महापौर ठाकरे बंधुंचाच!

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत बोलताना राऊतांनी मोठं वक्तव्य केलं.
“अजित पवारांशी युती करणं म्हणजे भाजपशी हातमिळवणी आहे. अजित पवार हे भाजपचे हस्तक आहेत.” असा आरोप त्यांनी केला.
तसेच, “मुंबईचा महापौर हा ठाकरे बंधुंचाच असेल. महापौर अस्सल मराठी माणूसच असेल,” असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आघाडीच्या हालचालींना वेग

संजय राऊत यांनी आज शरद पवारांची भेट घेणार असल्याचं सांगितलं असून, राज ठाकरे यांच्याशी चर्चाही सुरू असल्याचं स्पष्ट केलं. काँग्रेसकडूनही संदेश आल्याचं त्यांनी सांगितलं.