Home Breaking News Manikrao Kokate Health Update : नाशिक पोलिस रुग्णालयात पोहोचताच माणिकराव कोकाटेंची प्रकृती...

Manikrao Kokate Health Update : नाशिक पोलिस रुग्णालयात पोहोचताच माणिकराव कोकाटेंची प्रकृती खालावली? 

0
64

– कोकाटेंवर अँजिओग्राफी होण्याची शक्यता
मुंबई | विशेष प्रतिनिधी

नाशिकच्या सदनिका घोटाळा प्रकरणात दोषी ठरल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. दरम्यान, न्यायालयाच्या निर्णयानंतर त्यांचा रक्तदाब वाढल्याने त्यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, माणिकराव कोकाटे यांचा उच्च रक्तदाब नियंत्रणात नसल्याने त्यांना विश्रांतीची आवश्यकता आहे. यासंदर्भात लीलावती रुग्णालयाच्या डॉक्टरांनी नाशिक पोलिसांना लेखी स्वरूपात माहिती दिली आहे. त्यामुळे सध्या त्यांना काही दिवस वैद्यकीय देखरेखीखाली ठेवणे आवश्यक असल्याचे डॉक्टरांचे मत आहे.

आज अँजिओग्राफी होण्याची शक्यता

वैद्यकीय अहवाल आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, आज सकाळी माणिकराव कोकाटे यांची अँजिओग्राफी केली जाण्याची शक्यता आहे. अँजिओग्राफीच्या रिपोर्टनंतरच त्यांच्या डिस्चार्जबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. त्यानंतरच पोलिस आणि डॉक्टरांमध्ये पुढील कायदेशीर कारवाईबाबत चर्चा होणार आहे.

दरम्यान, NBW (नॉन बेलेबल वॉरंट) रुग्णालयातच बजावता येईल का, याबाबतही चर्चा सुरू आहे. मात्र, सध्याच्या वैद्यकीय परिस्थितीत तातडीने अटकेची शक्यता कमी असल्याचे बोलले जात आहे.

नाशिक पोलीस काय म्हणाले?

नाशिक पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लीलावती रुग्णालयातील रात्रपाळीचे इंचार्ज डॉ. कुलदीप देवरे यांचा जबाब नोंदवण्यात आला आहे. तसेच आतापर्यंत करण्यात आलेल्या उपचारांचा सविस्तर वैद्यकीय अहवाल रुग्णालय प्रशासनाकडून मागवण्यात आला आहे. पुढील उपचारांची दिशा काय असणार, याची माहिती लेखी स्वरूपात देण्याची मागणी पोलिसांनी केली आहे.

न्यायालयाच्या आदेशानुसारच कारवाई केली जाईल, असे स्पष्ट करत वैद्यकीय अहवाल प्राप्त होईपर्यंत प्रतीक्षा करणे आवश्यक असल्याचे पोलिसांनी सांगितले. नाशिकहून आलेल्या पोलिस पथकात महिला पोलिस नसल्याने वांद्रे पोलिसांकडून मदत घेण्यात आली आहे.

माणिकराव कोकाटे अडचणीत का?

नाशिक शहरातील कॅनडा कॉर्नर परिसरात सुमारे 30 वर्षांपूर्वी अल्प उत्पन्न गटात कमी उत्पन्न दाखवून सदनिका मिळवल्याप्रकरणी माणिकराव कोकाटे अडचणीत आले आहेत. मुख्यमंत्री कोट्यातून कोकाटे यांच्यासह विजय कोकाटे, पोपट सोनवणे आणि प्रशांत गोवर्धने या चार जणांना सदनिका देण्यात आल्या होत्या.

फेब्रुवारी 2025 मध्ये नाशिक जिल्हा न्यायालयाने त्यांना दोषी ठरवले होते. त्यानंतर नाशिक सत्र न्यायालयानेही ही शिक्षा कायम ठेवली. यानंतर माणिकराव कोकाटे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

न्यायालयाच्या निकालानंतर मंत्रिमंडळातील सदस्य व पक्षातील सहकारी म्हणून माणिकराव कोकाटे यांनी आपला राजीनामा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपूर्द केला आहे. “कायदे-नियम सर्वोच्च असून कोणत्याही व्यक्तीपेक्षा वरचढ आहेत,” असे पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

13 जणांचे पोलीस पथक मुंबईत

माणिकराव कोकाटे यांच्या अटकेसाठी नाशिक पोलिसांचे 13 सदस्यांचे पथक मुंबईत दाखल झाले आहे. यामध्ये तीन अधिकारी आणि दहा हवालदारांचा समावेश आहे. मात्र, आता लीलावती रुग्णालयातील डॉक्टरांचा वैद्यकीय अहवाल आणि पुढील उपचारांची दिशा यावरच अटक होणार की नाही, हे अवलंबून आहे.