– मुंबईनंतर वसई-विरारमध्येही मोठी हालचाल
– राजकारणाला नवा ट्विस्ट
मुंबई | विशेष प्रतिनिधी
महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग आला असून, शिवसेना ठाकरे गटानं एकाच वेळी दोन आघाड्यांवर हालचाली सुरू केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. युती-आघाड्यांची गणितं जुळताना आणि बिघडताना दिसत असून, मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मनसे आणि शिवसेना ठाकरे गटातील युती जवळपास अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. मात्र, युतीची अधिकृत घोषणा अद्याप रखडलेली आहे.
9 जागांवर तिढा, म्हणून घोषणा रखडली?
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मनसे आणि ठाकरे गटामध्ये सध्या 9 जागांवरून तिढा कायम आहे. जागावाटप पूर्णपणे निश्चित झाल्याशिवाय युतीची अधिकृत घोषणा नको, अशी मनसेची ठाम भूमिका असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे अंतिम चर्चा सुरू असली तरी युतीवर शिक्कामोर्तब होण्यासाठी थोडा अवधी लागू शकतो.
दरम्यान, आज मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांची एक महत्त्वाची बैठक होणार असून, या बैठकीत तोडगा निघण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या बैठकीनंतर मुंबई महापालिकेसाठी युतीची अधिकृत घोषणा होण्याची दाट शक्यता आहे.
मुंबईत तिघांची युती? ठाकरे गटाची मोठी खेळी
दरम्यान, आणखी एक मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मुंबई महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), शिवसेना ठाकरे गट आणि मनसे हे तिन्ही पक्ष एकत्रितपणे निवडणूक लढवू शकतात. विशेष म्हणजे, राष्ट्रवादी शरद पवार गटासाठी आपल्या कोट्यातून जागा देण्याची तयारी ठाकरे गटानं दर्शवल्याची माहिती आहे.
वसई-विरारमध्येही हालचाल, ठाकरे गटाचं शिष्टमंडळ थेट मैदानात
एकीकडे मुंबईतील युतीची चर्चा सुरू असतानाच, दुसरीकडे वसई-विरारमधून आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. बहुजन विकास आघाडीसोबत युतीबाबत चर्चा करण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचं शिष्टमंडळ थेट विरारमध्ये दाखल झालं आहे.
या शिष्टमंडळात मिलिंद नार्वेकर, विनायक राऊत, विलास पोतनीस आणि अमोल कीर्तीकर यांचा समावेश असून, हितेंद्र ठाकूर यांच्यासोबत विवा कॉलेज परिसरातील कार्यालयात बैठक सुरू आहे. विशेष बाब म्हणजे ठाकरे गटाचे नेते लोकलने प्रवास करत विरारला पोहोचले आहेत, यामुळे या भेटीला अधिक राजकीय महत्त्व प्राप्त झालं आहे.
युती होणार की नाही? जागावाटपाचं सूत्र काय?
आगामी वसई-विरार महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गट आणि बहुजन विकास आघाडी यांची युती होणार का? युती झाल्यास जागावाटपाचं सूत्र कसं असेल? या सर्व प्रश्नांवर सध्या राजकीय वर्तुळाचं लक्ष केंद्रीत झालं आहे.
महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटानं उचललेली ही दुहेरी राजकीय पावलं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणाची दिशा ठरवणारी ठरतील, यात शंका नाही.










