नवी दिल्ली | प्रतिनिधी
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा त्यांच्या आक्रमक निर्णयांमुळे चर्चेत आले आहेत. भारतावर आधीच टॅरिफ आणि H-1B व्हिसाबाबत कठोर भूमिका घेतल्यानंतर आता ट्रम्प प्रशासनाने थेट ग्रीन कार्ड लॉटरी प्रोग्राम सस्पेंड करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा सर्वाधिक फटका भारतीय नागरिकांना बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
ट्रम्प प्रशासनाकडून गुरुवारी या निर्णयाची अधिकृत घोषणा करण्यात आली. अमेरिकेतील ब्राउन विद्यापीठ आणि MIT येथे नुकत्याच घडलेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. या हल्ल्यातील आरोपी हा ग्रीन कार्ड लॉटरी प्रोग्रामचा लाभार्थी असल्याचा आरोप करण्यात येत असून, त्याच पार्श्वभूमीवर ट्रम्प यांच्या आदेशाने हा कार्यक्रम तात्काळ थांबवण्यात आला आहे.
दरम्यान, भारत आणि अमेरिकेतील संबंधांवर याचा थेट परिणाम होण्याची शक्यता आहे. भारताने रशियाकडून तेल खरेदी थांबवावी, असा दबाव ट्रम्प सातत्याने टाकत होते. मात्र भारताने आपली भूमिका कायम ठेवली आहे. नोव्हेंबर महिन्यात गेल्या सहा महिन्यांतील सर्वाधिक रशियन तेलाची खरेदी भारताने केल्याची आकडेवारी समोर आली होती. यामुळे अमेरिकेची नाराजी वाढल्याचे संकेत मिळत आहेत.
याआधी ऑगस्ट महिन्यात भारतावर 50 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय, H-1B व्हिसा शुल्कात मोठी वाढ आणि व्हिसा मुलाखती 2026 पर्यंत लांबणीवर टाकणे, असे अनेक निर्णय ट्रम्प प्रशासनाने घेतले होते. आता ग्रीन कार्ड लॉटरी प्रोग्राम बंद झाल्यामुळे भारताला आणखी एक मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.
ग्रीन कार्ड लॉटरी प्रोग्रामअंतर्गत दरवर्षी सुमारे 50 हजार परदेशी नागरिकांना अमेरिकेत कायमस्वरूपी वास्तव्यासाठी ग्रीन कार्ड दिले जात होते. भारतीय नागरिकांची संख्या या योजनेत मोठी असल्याने, या निर्णयामुळे सर्वाधिक नुकसान भारतीय अर्जदारांचे होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
ट्रम्प यांचे हे निर्णय निव्वळ सुरक्षा कारणांसाठी आहेत की त्यामागे राजकीय दबाव आणि भारतावर अप्रत्यक्ष कारवाई आहे, याबाबत आता मोठी चर्चा सुरू झाली आहे. आगामी काळात भारत सरकार यावर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.










