– बुटीबोरी एम.आय.डी.सी.मधील भीषण घटना
नागपूर | प्रतिनिधी
नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी एमआयडीसी परिसरात मंगळवारी सकाळी हृदयद्रावक दुर्घटना घडली. रिन्युएबल एनर्जी क्षेत्रात कार्यरत असलेल्या आवाडा कंपनीच्या प्लांटमध्ये बांधकाम सुरू असलेली पाण्याची टाकी अचानक फुटल्याने सहा कामगारांचा जागीच मृत्यू झाला, तर अनेक कामगार गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर बुटीबोरी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, घटनेच्या वेळी त्या ठिकाणी १५ ते २० कामगार काम करत होते. पाण्याची टाकी टेस्टिंगच्या टप्प्यात असताना अचानक ती फुटली. टाकीत साठवलेले लाखो लिटर पाणी प्रचंड वेगाने बाहेर पडल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला. पाण्याच्या जोरदार प्रवाहात १० ते १५ कामगार अडकले, काही कामगारांना दूरवर फेकले गेले.
पाण्याच्या दाबामुळे टाकी फुटल्याचा संशय
मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात या प्रकल्पाच्या बांधकामास सुरुवात झाली होती. कंपनीत सोलर पॅनल निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता असल्याने चार मोठ्या पाण्याच्या टाक्या उभारण्यात आल्या होत्या. त्यापैकी एका टाकीमध्ये क्षमतेपेक्षा अधिक पाणी साठवले गेले असावे, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. पाण्याचा दाब सहन न झाल्याने टाकी फुटली, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

टाकीच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
या घटनेनंतर टाकीच्या बांधकामाच्या गुणवत्तेवर आणि सुरक्षेच्या उपाययोजनांवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. टाकीची क्षमता, स्ट्रक्चरल डिझाइन, टेस्टिंग प्रक्रिया आणि सुरक्षा मानकांचे पालन झाले होते का, याची सखोल चौकशी होण्याची मागणी केली जात आहे.
पोलीस व प्रशासन घटनास्थळी
घटनेची माहिती मिळताच बुटीबोरी पोलीस ठाण्याचे अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. नागपूर (ग्रामीण) पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनीही घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला.
“निर्माणाधीन वॉटर टँकचे टेस्टिंग सुरू असताना हा अपघात झाला. यात सहा कामगारांचा मृत्यू झाला असून अनेक कामगार गंभीर जखमी झाले आहेत. घटनेचा सखोल तपास सुरू आहे,” अशी माहिती पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी दिली.
मृतकांची नावे
अरविंद कुमार ठाकुर (28, चंपारण, बिहार)
अशोक कंचन पटेल (42, पहाडपूर, बिहार)
अजय राजेश्वर पासवान (26, मुजफ्फरपूर, बिहार)
सुधांशु कुमार नागेश्वर साहणी (36, मुजफ्फरपूर, बिहार)
बुलेट कुमार इंद्रजित शाह (30, पश्चिम चंपारण, बिहार)
षमिम अन्सारी (42, मुजफ्फरपूर, बिहार)
अपघाताचा तपास सुरू
या दुर्घटनेमुळे कंपनीचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून परिसरातील सुरू असलेले बांधकाम आणि साहित्यही पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. प्रशासनाने घटनेचा तांत्रिक आणि कायदेशीर तपास सुरू केला असून, दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे संकेत देण्यात आले आहेत.
दरम्यान, या भीषण दुर्घटनेमुळे औद्योगिक परिसरातील कामगारांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कडक उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.










