– रुग्णालयात दाखल
अमरावती | जिल्हा प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे नेते आणि विधान परिषदेचे आमदार संजय खोडके यांचा आज अपघात झाला आहे. या अपघातात ते जखमी झाले असून, त्यांच्यावर अमरावती येथील रीम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
महापालिका निवडणुकीच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर संजय खोडके हे अमरावती शहरात कार्यकर्त्यांच्या बैठकीला जात होते. त्याचवेळी त्यांच्या दुचाकीला एका कारने जोरदार धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात खोडके यांच्या पायाला आणि मणक्याला मार लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अपघातानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी सुमारे ३ वाजताच्या सुमारास खोडके हे आपल्या दुचाकीवरून बैठक स्थळी निघाले असताना हा अपघात झाला. कारच्या धडकेमुळे ते रस्त्यावर कोसळले, त्यानंतर परिसरातील नागरिक आणि कार्यकर्त्यांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. या अपघातात त्यांच्या दुचाकीचेही नुकसान झाले आहे.
दरम्यान, या अपघातानंतर संजय खोडके यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी सांगितले की,
“आज दुपारी ३ वाजता दुचाकीवरून जात असताना अपघात झाला. सध्या माझ्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी सर्व तपासण्या केल्या असून रिपोर्ट नॉर्मल आहेत. मी सुखरूप आहे. काळजी करण्याचे कारण नाही. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार एक दिवस निरीक्षणाखाली रुग्णालयात राहावे लागणार आहे. या काळात माझ्यासोबत असलेल्या सर्व स्नेहीजनांचे मनापासून आभार.”
दरम्यान, या अपघातात मोठी दुर्घटना टळल्याचे सांगितले जात आहे. खोडके सुरक्षित असल्याने त्यांच्या समर्थकांनी सुटकेचा श्वास घेतला आहे. घटनेची पुढील चौकशी सुरू असून, पोलिसांकडून अधिक माहिती घेतली जात आहे.