Home क्रीडा टी20 वर्ल्डकप 2026 : 5 नवखे चेहरे, 7 जुन्यांचा पत्ता कट!

टी20 वर्ल्डकप 2026 : 5 नवखे चेहरे, 7 जुन्यांचा पत्ता कट!

0
50
– सूर्यकुमारच्या टीम इंडियात मोठे बदल
मुंबई | क्रीडा प्रतिनिधी
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली असून, या संघात मोठे बदल पाहायला मिळाले आहेत. गतविजेत्या संघातील तब्बल 7 खेळाडूंना यावेळी संघाबाहेर ठेवण्यात आले असून, 5 खेळाडूंना पहिल्यांदाच टी20 वर्ल्डकप खेळण्याची संधी मिळाली आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात निवड झालेल्या या 15 सदस्यीय संघाने क्रिकेटविश्वात मोठी चर्चा निर्माण केली आहे.
बीसीसीआयने यावेळी कोणत्याही राखीव खेळाडूंची घोषणा केलेली नाही. टी20 वर्ल्डकप 2026 भारतातच होणार असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती बीसीसीआय अधिकाऱ्यांनी दिली आहे. परदेशात स्पर्धा असती, तर राखीव खेळाडूंची आवश्यकता भासू शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या संघातून शुभमन गिलला डावलण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. तर अष्टपैलू अक्षर पटेलच्या खांद्यावर उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यामुळे संघातील नेतृत्व रचनेतही बदल दिसून येतो.
पहिल्यांदाच टी20 वर्ल्डकप खेळणारे 5 खेळाडू
टीम इंडियात पहिल्यांदाच टी20 वर्ल्डकप खेळणाऱ्या खेळाडूंमध्ये अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, रिंकु सिंह, हर्षित राणा आणि वॉशिंग्टन सुंदर यांचा समावेश आहे. या पाचही खेळाडूंना स्वतःला आंतरराष्ट्रीय स्तरावर सिद्ध करण्याची मोठी संधी मिळणार आहे. विशेषतः सलामीवीर अभिषेक शर्मावर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.
दोन वर्षांनंतर पुनरागमन
इशान किशन दोन वर्षांनंतर पुन्हा टी20 वर्ल्डकप खेळताना दिसणार आहे. याआधी त्याने 2021 च्या टी20 वर्ल्डकपमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते. त्यामुळे ही स्पर्धा त्याच्यासाठी पूर्णतः नवी नाही. त्याचप्रमाणे वरुण चक्रवर्तीही 2021 च्या स्पर्धेत खेळलेला असून, त्यालाही अनुभवाचा फायदा होणार आहे.
गतविजेत्या संघातील 7 खेळाडू बाहेर
मागील टी20 वर्ल्डकप जिंकणाऱ्या संघातील सात खेळाडूंना यावेळी डावलण्यात आल्याने निवड समितीच्या निर्णयावर चर्चा सुरू झाली आहे. नव्या दमाच्या खेळाडूंना संधी देत संघात तरुणाईचा भरणा करण्यात आला आहे.
आता सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली ही नवी टीम इंडिया टी20 वर्ल्डकप 2026 मध्ये भारताच्या अपेक्षांवर कितपत खरी उतरते, याकडे संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष लागले आहे.