Home देश विदेश रशियाची मोठी घोषणा! भारतासाठी ‘गेमचेंजर’ ठरणारा नवा सागरी मार्ग

रशियाची मोठी घोषणा! भारतासाठी ‘गेमचेंजर’ ठरणारा नवा सागरी मार्ग

0
48
In this pool photograph distributed by the Russian state agency Sputnik, Russia's President Vladimir Putin meets with Belgorod Region Governor in Moscow on July 11, 2025. (Photo by Mikhail METZEL / POOL / AFP) (Photo by MIKHAIL METZEL/POOL/AFP via Getty Images)
अमेरिकेची वाढली चिंता
चेन्नई | वृत्तसंस्था
भारत–रशिया संबंधांना नवी दिशा देणारी मोठी घोषणा रशियाकडून करण्यात आली आहे. रशियाचे कॅन्सूल जनरल व्हॅलेरी खोजेव यांनी चेन्नई येथे बोलताना चेन्नई–व्लादिवोस्तोक सागरी कॉरिडॉर (EMC) लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. हा सागरी मार्ग भारतासाठी ‘गेमचेंजर’ ठरण्याची शक्यता असून, यामुळे दोन्ही देशांमधील व्यापार आणि आर्थिक व्यवहारांना मोठी चालना मिळणार आहे.
काही दिवसांपूर्वी रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन भारत दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात भारत आणि रशिया यांच्यात अनेक महत्त्वाचे करार झाले होते. पुतीन यांच्या या दौऱ्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले होते. भारत–रशिया वाढती जवळीक अमेरिकेसाठी डोकेदुखी ठरत असल्याचेही या भेटीनंतर स्पष्ट झाले.
या दौऱ्यादरम्यान पुतीन यांनी भारताला कच्च्या तेलाचा पुरवठा कधीही कमी पडू देणार नाही, अशी ठाम भूमिका मांडली होती. या पार्श्वभूमीवर अमेरिकेने भारतावर टॅरिफ लावल्याने आंतरराष्ट्रीय राजकारणात तणाव वाढला होता. त्यानंतर आता रशियाकडून आलेली ही नवी घोषणा भारताच्या बाजूने मोठा धोरणात्मक फायदा करून देणारी मानली जात आहे.
चेन्नई–व्लादिवोस्तोक सागरी कॉरिडॉर म्हणजे काय?
व्हॅलेरी खोजेव यांनी सांगितले की, प्रस्तावित सागरी कॉरिडॉर भारताच्या पूर्व किनाऱ्याला रशियाच्या सुदूर पूर्व किनाऱ्याशी जोडणार आहे. भारतासोबत व्यापार आणि आर्थिक सहकार्य वाढवण्यासाठी हा प्रकल्प रशियासाठी धोरणात्मकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आहे. या मार्गामुळे दोन्ही देशांमधील व्यापार अधिक वेगवान आणि सुलभ होणार आहे.
प्रवासाचा कालावधी निम्म्यावर
सध्या भारत आणि रशिया यांच्यातील समुद्री प्रवासासाठी सुमारे ४० दिवसांचा कालावधी लागतो. मात्र हा सागरी कॉरिडॉर सुरू झाल्यानंतर हा कालावधी २० ते २२ दिवसांपर्यंत कमी होणार आहे. त्यामुळे आयात–निर्यात खर्चात घट होऊन व्यापार वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भारत–रशिया संबंधांना नवी गती
या कॉरिडॉरमुळे भारत आणि रशिया यांच्यातील आर्थिक, व्यापारी आणि धोरणात्मक संबंध अधिक दृढ होण्याची चिन्हे आहेत. ऊर्जा, कच्चे तेल, संरक्षण साहित्य आणि इतर व्यापार क्षेत्रांमध्ये भारताला याचा मोठा फायदा होऊ शकतो. याच कारणामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर, विशेषतः अमेरिकेत, या घडामोडीकडे अस्वस्थतेने पाहिले जात असल्याची चर्चा सुरू आहे.
चेन्नई–व्लादिवोस्तोक सागरी कॉरिडॉर प्रत्यक्षात कधी सुरू होतो, याकडे आता संपूर्ण जगाचे लक्ष लागले असून, हा प्रकल्प भारताच्या जागतिक व्यापारातील स्थान अधिक मजबूत करणार असल्याचे मानले जात आहे.