मुंबई/नागपूर : इंडिगो एअरलाईन्सचा सुरू असलेला गोंधळ सहाव्या दिवशीही कायम असून त्याचा फटका मंत्री, आमदार, वरिष्ठ अधिकारी आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. हिवाळी अधिवेशनासाठी नागपूरला येणाऱ्या लोकप्रतिनिधींचे नियोजन कोलमडले असून, शेवटच्या क्षणी पर्यायी मार्ग स्वीकारण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई, पुणे आणि इतर शहरांतून नागपूरकडे मोठ्या प्रमाणात उड्डाणे नियोजित होती. अनेकांनी इंडिगोची तिकिटे घेतली होती. मात्र सलग सहाव्या दिवशीही उड्डाणे रद्द होणे आणि दीर्घ विलंब सुरू राहिल्याने, मंत्री–आमदारांना तिकिटे रद्द करून रेल्वे, रस्ता किंवा चार्टर फ्लाइट्सचा पर्याय स्वीकारावा लागला.
इंडिगोच्या उड्डाणांमध्ये सुरू असलेल्या अडचणींमुळे इतर विमान कंपन्यांनी तिकीटदर वाढवले, त्यामुळे प्रवाशांना मनस्तापासह आर्थिक फटका बसला आहे.

अधिवेशनाच्या नियोजनावर परिणाम
उद्यापासून नागपुरात हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. त्यासाठी आजच मंत्र्यांनी आणि आमदारांनी उपराजधानीत पोहोचणे आवश्यक होते. मात्र मुंबई–नागपूर आणि पुणे–नागपूर या मार्गांवरील उड्डाणे वारंवार रद्द झाल्याने अनेकांचे नियोजन विस्कळीत झाले.
काही मंत्री आणि आमदारांनी समृद्धी महामार्ग निवडून नागपूरकडे प्रयाण केले, तर काहींनी रेल्वे किंवा चार्टर विमान हे पर्याय निवडले.
इंडिगोच्या गोंधळामुळे लोकप्रतिनिधींसोबतच अधिकाऱ्यांचीही चांगलीच धावपळ उडाल्याचे चित्र दिसले.
मुंबई विमानतळावर प्रवाशांची अद्यापही गर्दी
मुंबई विमानतळावरील इंडिगो काउंटरवर प्रवासी अजूनही रांगेत उभे आहेत. अनेकांनी तिकिटे परत केली असून काहींना तर आपले सामानही मिळालेले नाही.
एका महिलेचे लग्नासाठी प्रवासाचे तिकीट रद्द झाल्याने तिचे मोठे नुकसान झाले असून तिचे सामानही हरवल्याची तक्रार आहे. दुसऱ्या एका प्रवाशाला तिकीट असतानाही कोणतीही अपडेट मिळाली नाही.
कंपनीचा दावा — समस्या लवकरच सुटेल
इंडिगोच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले की, आजपासून काही उड्डाणे सुरू करण्यात आली आहेत. प्रवाशांची पडताळणी करून त्यांना पाठवले जात आहे. “समस्या हळूहळू सोडवली जात असून लवकरच सर्व काही सुरळीत होईल,” असा दावा इंडिगो कर्मचाऱ्यांनी केला आहे.
कर्करोगग्रस्त महिलेच्या प्रकरणात तातडीने उपाय केले जातील, असेही कंपनीकडून सांगण्यात आले.










