Home महाराष्ट्र हिवाळी अधिवेशन 2025 : इतिहासात प्रथमच विरोधी पक्षनेत्यांविना अधिवेशन

हिवाळी अधिवेशन 2025 : इतिहासात प्रथमच विरोधी पक्षनेत्यांविना अधिवेशन

0
47

पुरवणी मागण्यांवर राज्याचे लक्ष

नागपूर | Maharashtra Winter Session 2025

महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आज नागपुरात सुरुवात झाली आहे. यंदाचे अधिवेशन राज्याच्या राजकीय इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे, कारण प्रथमच अधिवेशनाचे दोन्ही सभागृह विरोधी पक्षनेत्यांशिवाय कामकाज करणार आहेत. कामकाज पत्रिकेत विरोधी पक्षनेता निवडीसंदर्भात कोणताही उल्लेख नसल्याने राज्याच्या राजकारणात याबाबत चर्चेला ऊत आला आहे.

विधान परिषदेमध्ये काँग्रेसकडून सतेज पाटील यांचे, तर विधानसभेमध्ये शिवसेना (ठाकरे गट) कडून भास्कर जाधव यांचे नाव विरोधी पक्षनेते पदासाठी देण्यात आले आहे. मात्र सरकारकडून या दोन्हीही पदांना मान्यता देण्यात आलेली नाही.

जनतेच्या वाढलेल्या अपेक्षा; पहिल्या दिवशी पुरवणी मागण्या

सात दिवसांचे हे अधिवेशन राज्यातील सर्वसामान्य नागरिकांसाठी, विशेषतः शेतकरी आणि विदर्भातील जनतेसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.
पहिल्या दिवशी पुरवणी मागण्या सादर केल्या जाणार आहेत. त्यानंतर शासकीय कामकाज, शोकप्रस्ताव आणि मग दिवसभरासाठी कामकाज स्थगित केले जाईल.

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असून, या निवडणुकांचा प्रभाव पुरवणी मागण्यांवर पडणार का? तसेच काही नवीन घोषणांची शक्यता आहे का, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल

अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या राजकीय घडामोडींनी वातावरण आणखीनच तापले आहे.
सरकारच्या चहापान कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार बहारीनमध्ये असल्यामुळे गैरहजर राहिले. त्याचवेळी सत्ताधाऱ्यांच्या चहापानाला महाविकास आघाडीने बहिष्कार टाकला.

विरोधी पक्षनेतेपद रिक्त ठेवण्याच्या निर्णयावरून विजय वडेट्टीवार आणि भास्कर जाधव यांनी सरकारवर जोरदार टीका केली.
“विरोधी पक्षनेते पद रिक्त ठेवणे हा संविधानाचा अपमान असून सरकारला विरोधकांचा आवाज दाबायचा आहे,” असा आरोप त्यांनी केला.

हिवाळी अधिवेशनात येणाऱ्या निर्णायक चर्चांवर आणि पुरवणी मागण्यांवरील निर्णयांवर राज्याचे लक्ष केंद्रीत असणार आहे.