हॅन्डबॉल मैदानाच्या उद्घाटनावेळी क्रीडा मंत्र्यांचे मोठे संकेत!
नागपूर : राज्यातील खेळाडूंना जागतिक दर्जाच्या सुविधा देण्यासाठी राज्य सरकार गंभीरपणे तयारीला लागले आहे. सन 2026 च्या ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्र व भारतातील खेळाडू चमकदार कामगिरी करतील, असा विश्वास क्रीडा व युवक कल्याण मंत्री माणिकराव कोकाटे यांनी व्यक्त केला.
येथील क्रीडा प्रबोधिनीतील अत्याधुनिक हॅन्डबॉल मैदानाचे लोकार्पण करताना ते बोलत होते. नव्या सुविधेमुळे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाडू घडण्यास मोठा हातभार लागेल, असेही ते म्हणाले.
हॅन्डबॉल मैदानाचे लोकार्पण; मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमाला क्रीडा व युवक कल्याण मंत्री महोदयांचे विशेष कार्य अधिकारी रवींद्र नाईक, विभागीय उपसंचालक पल्लवी धात्रक, चंद्रपूरचे क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, वर्धाच्या आशा मेश्राम, भंडाऱ्याच्या लतिका लेकुरवाळे, गडचिरोलीचे भास्कर घटाळे यांची उपस्थिती होती.
प्रबोधिनीतील खेळाडूंना क्रीडा साहित्याचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यामुळे खेळाडूंमध्ये उत्साहाचे वातावरण होते.

आंतरराष्ट्रीय पदकविजेत्यांचा सन्मान
आशियाई ॲक्रोबॅटिक जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत कांस्यपदक मिळवणाऱ्या खेळाडूंना मंत्र्यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. या कामगिरीमुळे नागपूरच्या क्रीडा क्षेत्राला नवा मान मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
कार्यक्रमास आंतरराष्ट्रीय हॅन्डबॉलपटू व शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त सुनील भोतमांगे, तसेच आंतरराष्ट्रीय हॅन्डबॉलपटू इंदरजीत सिंह रंधावा यांसह मोठ्या प्रमाणावर क्रीडाप्रेमी उपस्थित होते.

मिशन लक्ष्यवेध अंतर्गत क्रीडा विज्ञान केंद्रास भेट
या कार्यक्रमानंतर क्रीडा मंत्री श्री. कोकाटे यांनी ‘मिशन लक्ष्यवेध’उपक्रमांतर्गत विभागीय क्रीडा संकुल येथील क्रीडा विज्ञान केंद्रास सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी खेळाडूंना दिल्या जाणाऱ्या शास्त्रशुद्ध प्रशिक्षण पद्धती, तंदुरुस्ती चाचण्या, आहार नियोजन, पुनर्वसन सुविधा तसेच आधुनिक उपकरणांची पाहणी केली.










