- उर्वरित 77 जागांवर शिंदे–फडणवीस घेणार अंतिम निर्णय
- महायुतीचाच महापौर होणार – अमित साटम
मुंबई | प्रतिनिधी
मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजप, शिवसेना आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (रिपाई) यांचा समावेश असलेल्या महायुतीमध्ये 227 पैकी तब्बल 150 जागांवर एकमत झाले असून उर्वरित 77 जागांवर चर्चा सुरू आहे. येत्या दोन-तीन दिवसांत ही चर्चा पूर्ण होईल, अशी माहिती मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी दिली. आज भाजपचे अमित साटम आणि शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत याबाबत सविस्तर माहिती दिली.
अमित साटम यांनी स्पष्ट केले की, उर्वरित जागांवरील अंतिम निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकमताने घेतील. “महायुतीचा एकमेव उद्देश म्हणजे मुंबई महानगरपालिकेला भ्रष्टाचारमुक्त प्रशासन देणे. मुंबईकरांची अपेक्षा पूर्ण करण्यासाठी भाजप, शिवसेना आणि रिपाई पूर्णपणे कटिबद्ध आहेत,” असे त्यांनी सांगितले.
महायुतीचा महापौर निश्चित – 150 पेक्षा जास्त जागा जिंकणार
कोण किती जागा लढवणार यापेक्षा महायुती एकत्रितपणे 227 जागा लढणार असून 150 पेक्षा जास्त जागा जिंकून महायुतीचाच महापौर विराजमान होईल, असा ठाम विश्वास अमित साटम यांनी व्यक्त केला. “गेल्या 25 वर्षांत मुंबई महानगरपालिकेत बसून भ्रष्टाचार करणाऱ्यांना आता रोखायचे आहे. मुंबई विकून खाणाऱ्यांचा डाव आम्ही यशस्वी होऊ देणार नाही,” असा आरोपही त्यांनी केला.
युतीच्या मजबुतीबाबत बोलताना साटम म्हणाले, “धनुष्यबाण आणि कमळ हे दोन्ही एकच आहेत. कोणत्याही कारणाने ही युती तुटणार नाही. महाराष्ट्राच्या जनतेसाठी आणि मुंबईकरांसाठी काम करणे हेच आमचे अंतिम ध्येय आहे.”
नवाब मलिक यांच्या राष्ट्रवादीसोबत कोणतेही संबंध नाहीत
नवाब मलिक यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसबाबत भूमिका स्पष्ट करत अमित साटम म्हणाले, “त्यांच्याबरोबर आमचं काहीही देणंघेणं नाही. जोपर्यंत ते निर्दोष मुक्त होत नाहीत, तोपर्यंत आम्ही कोणतेही संबंध ठेवणार नाही.”
150 जागांवर एकमत, उर्वरित 77 जागांवर चर्चा – उदय सामंत
शिवसेनेचे मंत्री उदय सामंत म्हणाले की, “150 ठिकाणी आमचं एकमत झालं आहे. उर्वरित 77 जागांवर चर्चा होईल. जागांची संख्या महत्त्वाची नाही, तर महायुती म्हणून पुढे जाणे महत्त्वाचे आहे.” महायुती अतिशय घट्ट असून कोणत्याही मुद्द्यावर युती तुटणार नाही, असा पुनरुच्चार त्यांनी केला. उर्वरित जागांबाबत मतभेद राहिल्यास त्याचा अंतिम निर्णय देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मुंबईकरांचे स्वप्न पूर्ण करणे हेच महायुतीचे कर्तव्य असून, येणाऱ्या निवडणुकीत महायुती दमदार विजय मिळवेल, असा विश्वास दोन्ही नेत्यांनी व्यक्त केला.










