– अटक वॉरंट घेऊन नाशिक पोलिस लीलावती रुग्णालयात दाखल
- मुंबई | प्रतिनिधी
सदनिका गैरव्यवहार प्रकरणात दोषी ठरलेले राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अटकेची प्रक्रिया अखेर सुरू झाली आहे. नाशिक सत्र न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर जारी करण्यात आलेले अटक वॉरंट बजावण्यासाठी नाशिक पोलिस बुधवारी रात्री उशीरा मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल झाले.
कोकाटे सध्या उपचारासाठी लीलावती रुग्णालयात दाखल असून, नाशिक पोलिसांनी वांद्रे पोलिसांशी समन्वय साधत तसेच उपचार करणाऱ्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन अटकेची प्रक्रिया पूर्ण करण्यास सुरुवात केली आहे.
दरम्यान, याच दिवशी संध्याकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा स्वीकारून तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवला होता. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी हा राजीनामा राज्यपालांकडे मंजुरीसाठी रवाना केला. याआधीच कोकाटे यांच्याकडील मंत्रिपदाचा कार्यभार बुधवारी रात्री काढून घेण्यात आला होता आणि त्यांची सर्व खाती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली होती. त्यामुळे काही काळ कोकाटे हे बिनखात्याचे मंत्री होते.
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सभागृहात मोबाईलवर रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर विरोधकांकडून तीव्र टीका करण्यात आली होती. त्यानंतर कोकाटे यांच्याकडील कृषी खाते काढून घेण्यात आले, तर त्यांच्याकडे फक्त क्रीडा खाते ठेवण्यात आले होते.
कोकाटे यांच्यावर शासकीय सदनिका मिळवण्यासाठी अल्प उत्पन्नाचे खोटे कागदपत्रे सादर केल्याचा आरोप होता. या प्रकरणी नाशिक सत्र न्यायालयाने त्यांना दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती आणि त्यानुसार अटक वॉरंट जारी करण्यात आले होते.
राजीनामा, मंत्रिपद काढून घेणे आणि आता थेट रुग्णालयात अटकेची कारवाई—या संपूर्ण घडामोडींमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.










