Home Breaking News नगर परिषद–नगर पंचायत निकाल अपडेट : 288 जागांपैकी 195 वर महायुती आघाडीवर

नगर परिषद–नगर पंचायत निकाल अपडेट : 288 जागांपैकी 195 वर महायुती आघाडीवर

0
152
भाजपचा दबदबा कायम
मुंबई | प्रतिनिधी
राज्यातील नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या एकूण 288 जागांची मतमोजणी सुरू असून, आतापर्यंतच्या कलांमध्ये महायुतीने मोठी आघाडी घेतल्याचं स्पष्ट होत आहे. नगर परिषदेच्या 246 आणि नगर पंचायतीच्या 42 जागांसाठी ही मोजणी सुरू असून, महायुती 195 जागांवर आघाडीवर आहे. तर महाविकास आघाडीला केवळ 47 जागांवरच आघाडी मिळाली आहे.
ताज्या कलांनुसार भाजप सर्वात मोठा पक्ष ठरत असून, भाजप 111 जागांवर आघाडीवर आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिंदे गट 47 जागांवर, तर उपमुख्यमंत्री अजित पवार गट 34 जागांवर आघाडीवर आहे. दुसरीकडे काँग्रेसने 32 जागांवर आघाडी घेत तुलनेने चांगली लढत दिली आहे. ठाकरे गट 7 तर शरद पवार गट 8 जागांवर आघाडीवर आहे.
नगर पंचायतीत भाजपचा वरचष्मा
नगर पंचायतीच्या 42 जागांपैकी भाजप 24 जागांवर आघाडीवर असून पुन्हा एकदा आपली ताकद दाखवत आहे. शिंदे गट 5, अजित पवार गट 3 आणि काँग्रेस 4 जागांवर आघाडीवर आहे. ठाकरे गटाला केवळ एका जागेवर आघाडी मिळाली आहे. विशेष म्हणजे शरद पवार गटाला नगर पंचायतीत अद्याप एकाही जागेवर आघाडी घेता आलेली नाही. मनसे आणि वंचित बहुजन आघाडीचीही तीच अवस्था आहे. शरद पवार गटासाठी हा निकाल मोठा धक्का मानला जात आहे.
नगर परिषदेतही भाजपची ‘शतकी’ कामगिरी
नगर परिषद निवडणुकीत भाजपने 111 जागांवर आघाडी घेत 100 चा आकडा पार करणारा राज्यातील एकमेव पक्ष ठरला आहे. शिंदे गटानेही 46 जागांवर आघाडी घेत नेत्रदीपक यश मिळवलं आहे. प्रचाराच्या पहिल्या दिवसापासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गावागावात जाऊन आक्रमक प्रचार केला. आमदार आणि पदाधिकाऱ्यांच्या मेहनतीचं फळ शिंदे गटाला मिळाल्याचं चित्र आहे.
दुसरीकडे महाविकास आघाडीचा प्रचार या निवडणुकीत कमकुवत ठरल्याचं दिसून आलं. बड्या नेत्यांच्या सभा फारशा न झाल्याने, विशेषतः उद्धव ठाकरे यांची उपस्थिती न दिसल्याने ठाकरे गटाला मोठा फटका बसल्याचं राजकीय विश्लेषक सांगत आहेत.
दरम्यान, मतमोजणी अजूनही सुरू असून अंतिम निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.