– मुंबई महापालिकेसाठी गुप्त भेटीगाठी
– युतींचं गणित बदलणार?
मुंबई | प्रतिनिधी
नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीच्या निकालात महाविकास आघाडीला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला असून अवघ्या 50 जागांवरच समाधान मानावं लागलं आहे. मात्र या निकालात काँग्रेसची कामगिरी तुलनेने समाधानकारक ठरली आहे. काँग्रेसचे 30 नगराध्यक्ष विजयी झाले असून, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रत्येकी 10 नगराध्यक्षपदाचे उमेदवार विजयी झाले आहेत.
दुसरीकडे महायुतीने राज्यभरात जोरदार मुसंडी मारली असून तब्बल 214 नगराध्यक्षपदांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहेत. यात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असून भाजपचे 120 उमेदवार विजयी झाल्याने विरोधकांच्या अडचणी वाढल्या आहेत.
दरम्यान, या निकालानंतर आता सर्वच पक्षांचे लक्ष मुंबई महापालिका निवडणुकीकडे वळले आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस मोठा राजकीय निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडी यांच्यात युती होण्याची शक्यता चर्चेत आली असून, आज मुंबई काँग्रेसच्या शिष्टमंडळाने वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे.
काँग्रेसने यापूर्वीच मुंबई महापालिकेच्या सर्व 227 जागा लढवण्याची घोषणा केली असली तरी, समविचारी पक्षांना सोबत घेण्याची तयारीही काँग्रेसकडून सुरू असल्याचं चित्र आहे. मुंबईत अनुसूचित जाती प्रवर्गातील 49 जागा असल्याने वंचित बहुजन आघाडीसोबत युती करण्याबाबत काँग्रेस उत्सुक असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
दुसरीकडे, मुंबई महापालिकेसाठी शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांची युती होण्याची शक्यता जवळपास निश्चित मानली जात आहे. यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गट देखील सहभागी होऊ शकतो, तसे संकेत मिळत असून शिवसेना ठाकरे गट आपल्या कोट्यातून राष्ट्रवादी शरद पवार गटाला जागा देण्यास तयार असल्याची चर्चा आहे. मात्र काँग्रेसने मनसे आणि एमआयएमसोबत कोणत्याही परिस्थितीत युती करणार नसल्याचं आधीच स्पष्ट केलं आहे.
त्यामुळे आता मुंबई महापालिकेच्या रणधुमाळीत महाविकास आघाडी वेगवेगळ्या वाटांवर जाण्याची शक्यता असून, काँग्रेस शिवसेना ठाकरे गटाला वगळून वंचित बहुजन आघाडीसोबत स्वतंत्र आघाडी बांधणार का, याकडे साऱ्या राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी युतींचं हे बदलतं गणित नेमकं कोणाला फायदेशीर ठरणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.










