ठाणे | प्रतिनिधी
राज्यातील अडीच लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबांतील महिलांसाठी सुरू करण्यात आलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यात दरमहा 1500 रुपये जमा केले जातात. विधानसभा निवडणुकीपूर्वी सुरू झालेल्या या योजनेचा महायुतीला मोठा राजकीय फायदा झाल्याचं मानलं जातं.
दरम्यान, महायुती सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर या सन्मान निधीत वाढ करून 2100 रुपये देण्याचं आश्वासन अनेक नेत्यांकडून देण्यात आलं होतं. मात्र अद्याप याबाबत अधिकृत निर्णय झालेला नव्हता. अशातच आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात मोठं वक्तव्य केलं आहे.
नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीच्या निकालानंतर प्रतिक्रिया देताना एकनाथ शिंदे म्हणाले की, या निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळालं असून 288 पैकी तब्बल 214 नगराध्यक्षपदांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहेत. भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला असून शिवसेना शिंदे गट दुसऱ्या क्रमांकावर आहे. शिवसेना शिंदे गटाचे 57 नगराध्यक्ष विजयी झाल्याचा त्यांना विशेष आनंद असल्याचं त्यांनी सांगितलं.
“शिवसेनेच्या इतिहासात इतक्या मोठ्या संख्येने नगराध्यक्ष कधीच निवडून आले नव्हते. या विजयासाठी कार्यकर्ते आणि लाडक्या बहिणींचं मनापासून अभिनंदन,” असं म्हणत शिंदे यांनी सरकारच्या विविध योजनांचा उल्लेख केला. लाडकी बहीण, लेक लाडकी लखपती, मुलींना मोफत उच्च शिक्षण, आरोग्याच्या अनेक योजना आम्ही राबवल्या असून याचा मला समाधान असल्याचं ते म्हणाले.
महाविकास आघाडी सरकारने अडीच वर्षे विकासकामांना लावलेल्या स्थगितीचा उल्लेख करत, “आम्ही ते सगळे अडथळे दूर करून महाराष्ट्राला पुढे नेलं,” असा टोला त्यांनी लगावला. पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, “मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही माझी आवडती योजना आहे. अनेकांनी या योजनेला विरोध केला, पण तो मोडून काढत आम्ही योजना सुरू ठेवली. कोणताही माई का लाल ही योजना बंद करू शकत नाही. लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार म्हणजे देणार, योग्य वेळी सन्मान निधीत वाढ केली जाईल,” अशी ठाम घोषणा त्यांनी यावेळी केली.
एकनाथ शिंदेंच्या या वक्तव्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांमध्ये उत्सुकता वाढली असून, सरकार कधी आणि कशा पद्धतीने ही वाढ जाहीर करणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.










