Home विदर्भ लाडक्या बहिणींनी पालकमंत्री अन् माजी खासदारांना नाकारले

लाडक्या बहिणींनी पालकमंत्री अन् माजी खासदारांना नाकारले

0
60
– नगर परिषद निकालांनी जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघाले:

– काही ठिकाणी सत्तांतर, काही ठिकाणी भाजपचा गड कायम

वर्धा | जिल्हा प्रतिनिधी

वर्धा जिल्ह्यात झालेल्या नगर परिषद निवडणुकांचे निकाल जाहीर होताच जिल्ह्यातील राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलली आहेत. काही नगर परिषदांत सत्तांतर घडले असताना, काही ठिकाणी मतदारांनी विद्यमान सत्तेला पुन्हा संधी दिली आहे. या निकालांनी स्थानिक नेत्यांची ताकद, जनतेचा कौल आणि आगामी राजकारणाची दिशा स्पष्ट केली आहे.

देवळी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभा घेतली होती, त्या सभेमध्ये लाडक्या बहिणींना भाषणात म्हटले होते की तुम्ही आम्हाला सावरा आम्ही तुम्हाला मदत करू अशी गळ घातली होती, मात्र त्याच लाडक्या बहिणींनी पालकमंत्री व माजी खासदार यांना नाकारल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. देवळी येथे अपक्ष तर वर्धा काँग्रेस विजय झाले आहे.

वर्धा नगर परिषदेत पालकमंत्र्यांना दारुण पराभव स्वीकारावा लागला आहे. जनतेने काँग्रेसचे सुधीर पांगुळ यांना स्पष्ट कौल देत दणदणीत विजय मिळवून दिला. वर्ध्यातील ‘लाडके भाऊ’ म्हणून ओळखले जाणारे पालकमंत्री आणि त्यांचे निकटवर्तीय निलेश किटे यांना लाडक्या बहिणींनी थेट नाकारले, ही बाब राजकीय वर्तुळात विशेष चर्चेचा विषय ठरली आहे.

३५ वर्षांपासून भाजपकडे असलेली सत्ता ३५ वर्षीय उमेदवाराने संपवली. माजी खासदार रामदास तडस यांच्या पत्नीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री, माजी खासदार नवनीत राणा तसेच पालकमंत्री स्वतः मैदानात उतरले होते. मात्र, या सर्व प्रचारानंतरही अपक्ष उमेदवार किरण अरुणराव ठाकरे यांनी विजय मिळवत भाजपला मोठा धक्का दिला. सलग दोन वेळा आमदार आणि तीन वेळा खासदार राहिलेल्या तडस यांना आपल्या बालेकिल्ल्यात पराभव स्वीकारावा लागला.

पुलगाव नगर परिषदेतही भाजपला सत्तेपासून दूर व्हावे लागले. भाजपचे आमदार राजेश बकाने यांनी मोठे प्रयत्न केले, तरी ते अपयशी ठरले. काँग्रेसचे माजी आमदार रणजित कांबळे यांनी प्रचंड मेहनत घेत काँग्रेसच्या कविता सुनील ब्राह्मणकर यांना मोठ्या मताधिक्याने विजयी केले.

हिंगणघाट येथे मात्र भाजपचा गड कायम राहिला. पदवीधर उमेदवार नयना उमेश तुळसकर यांनी दणदणीत विजय मिळवला. आमदार समीर कुणावार यांनी हिंगणघाटची सत्ता राखत भाजपचा विश्वास टिकवून ठेवला. सिंदी रेल्वे येथेही भाजपने सत्ता कायम राखली. येथे भाजपच्या राणी स्नेहल कलोडे यांनी मोठा विजय मिळवला, तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) प्रभावी ठरला.

आर्वीमध्ये दोन आमदारांच्या उपस्थितीमुळे खासदारांसाठी ही निवडणूक आव्हानात्मक ठरली. सुमित वानखेडे यांनी उमेदवारी दिलेल्या महिला उमेदवार विजयी झाल्या. एकूणच या निकालांतून मतदारांनी बदल आणि स्थैर्य यांचा समतोल साधत जिल्ह्यातील राजकारणाला नवी दिशा दिली आहे.