Home देश विदेश ट्रम्प यांचा नवा डाव; अमेरिकेत भारतीयांच्या नोकऱ्यांवर गंडांतर

ट्रम्प यांचा नवा डाव; अमेरिकेत भारतीयांच्या नोकऱ्यांवर गंडांतर

0
51
– हजारो H-1B व्हिसाधारक भारतात अडकले
वॉशिंग्टन/नवी दिल्ली | विशेष प्रतिनिधी

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका नव्या निर्णयामुळे खळबळ उडाली असून त्याचा थेट फटका अमेरिकेत काम करणाऱ्या लाखो भारतीयांना बसण्याची शक्यता आहे. भारताने रशियाकडून तेल खरेदी सुरूच ठेवल्याने अमेरिकेचा दबाव निष्फळ ठरला, आणि त्यानंतर आता अमेरिकेकडून भारतीयांवर अप्रत्यक्ष दबाव वाढवण्याचा नवा डाव टाकण्यात आल्याचे चित्र आहे.

अमेरिकेने यापूर्वी भारतावर 50 टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली होती. मात्र भारताने रशियाकडून तेल खरेदी थांबवली नाही. उलट, नोव्हेंबर महिन्यात भारताने रशियाकडून केलेली तेलखरेदी गेल्या सहा महिन्यांचा विक्रम मोडणारी ठरली. यामुळे अमेरिका नाराज झाली असून आता त्याचे परिणाम थेट भारतीय व्यावसायिकांवर होताना दिसत आहेत.

दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या निर्णयामुळे H-1B व्हिसाधारक भारतीयांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. या महिन्याच्या सुरुवातीला वर्क परमिट (वर्क व्हिसा) नुतनीकरणासाठी भारतात आलेल्या हजारो भारतीयांची अमेरिकन दूतावासाकडून अचानक अपॉइंटमेंट रद्द करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, पुढील अपॉइंटमेंट थेट पुढील वर्षी दिली जाईल, असे संकेत देण्यात आले आहेत.

यामुळे व्हिसा नुतनीकरणासाठी भारतात आलेले अनेक भारतीय नागरिक सध्या भारतातच अडकून पडले आहेत. त्यांना पुन्हा अमेरिकेत परतता येत नसल्याने नोकरी, प्रकल्प आणि आर्थिक स्थैर्यावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या भारतीयांसाठी ही परिस्थिती अत्यंत चिंताजनक मानली जात आहे.
एकीकडे भारत अमेरिकेच्या दबावाला न जुमानता स्वतंत्र धोरणावर ठाम आहे, तर दुसरीकडे या राजकीय संघर्षाचा फटका सामान्य भारतीयांना बसत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. पुढील काळात अमेरिका या मुद्द्यावर काय भूमिका घेते, आणि भारत यावर कोणते राजनैतिक पाऊल उचलतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.