– EU देशांच्या डेअरी उत्पादनांवर 42.7% टॅरिफ
– जागतिक बाजार हादरणार?
बीजिंग :
जागतिक पातळीवर सुरू असलेलं टॅरिफ युद्ध आता आणखी तीव्र झालं असून चीनने मोठा प्रतिहल्ला करत युरोपियन युनियन (EU) अंतर्गत येणाऱ्या सर्व देशांवर प्रचंड टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहे. चीनने EU देशांकडून आयात होणाऱ्या सर्व प्रकारच्या डेअरी उत्पादनांवर तब्बल 42.7 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला असून, यामुळे जागतिक व्यापार आणि बाजारपेठांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
टॅरिफ युद्धाची सुरुवात अमेरिकेकडून झाली होती. भारत आणि चीन रशियाकडून मोठ्या प्रमाणावर तेल खरेदी करत असल्यामुळे अमेरिकेने या दोन्ही देशांवर टॅरिफ लावले. गेल्या ऑगस्ट महिन्यात डोनाल्ड ट्रम्प यांनी नव्या टॅरिफ धोरणाची घोषणा करत भारतावर अतिरिक्त 25 टक्के टॅरिफ लावला होता. सध्या अमेरिकेकडून भारतावर एकूण 50 टक्के टॅरिफ लागू आहे. रशियाकडून होणाऱ्या तेलखरेदीचा वापर युद्धासाठी होत असल्याचा आरोप अमेरिकेने केला आहे.
दरम्यान, अमेरिकेच्या टॅरिफ धोरणाचा फटका जागतिक निर्यातीला बसत असतानाच मॅक्सिकोनेही भारतासह आशियातील प्रमुख देशांवर 50 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 1 जानेवारीपासून हे टॅरिफ लागू होणार आहेत. अशा पार्श्वभूमीवर आता चीनने घेतलेला नवा निर्णय टॅरिफ वॉर अधिकच भडकवणारा ठरत आहे.
चीनच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, EU देशांकडून येणाऱ्या डेअरी उत्पादनांमुळे चीनच्या स्थानिक डेअरी उद्योगाला मोठा फटका बसत आहे. युरोपियन युनियनमधील देश त्यांच्या डेअरी उत्पादकांना मोठ्या प्रमाणात सबसिडी देतात. त्यामुळे ही उत्पादनं चीनमध्ये अत्यंत कमी किमतीत विकली जात असून, यामुळे चीनमधील शेतकरी आणि स्थानिक कंपन्या तोट्यात जात आहेत. अनेक डेअरी कंपन्यांवर बंद पडण्याची वेळ आल्याचंही चीनने स्पष्ट केलं आहे.
या पार्श्वभूमीवर चीनने EU देशांच्या डेअरी उत्पादनांवर 42.7 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला असून, हा नवा टॅरिफ 23 एप्रिलपासून लागू होणार आहे. या निर्णयामुळे युरोपियन देशांच्या निर्यातीला मोठा फटका बसण्याची शक्यता असून, त्याचे पडसाद जागतिक बाजारपेठांवर उमटण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.
एकीकडे अमेरिका, मॅक्सिको आणि आता चीन अशा प्रमुख अर्थव्यवस्थांकडून टॅरिफचे शस्त्र उपसले जात असताना, जागतिक व्यापार व्यवस्थेवर गंभीर परिणाम होण्याची भीती निर्माण झाली आहे. येत्या काळात या टॅरिफ युद्धातून तोडगा निघतो की संघर्ष अधिकच वाढतो, याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे.










